लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील रेगडी येथील दिना धरणातील पाण्याचा वापर करून अनेक गावांतील शेतकरी विविध पिके घेतात. खरिपातील अंतिम टप्प्यातही पिकांना पाणी उपलब्ध हाेते तर उन्हाळ्यातही अनेक शेतकरी उन्हाळी धान पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. सध्या तालुक्यात सहा मायनरमधील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे. पीक जाेमात असताना पाण्याची गरज लक्षात घेऊन धरणाचे पाणी साेडण्यात आले. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पिकांना संजीवनी मिळाली आहे. रेगडी येथील दिना धरणातून चामाेर्शी तालुक्यातील ६ मायनर अंतर्गत येणाऱ्या गावांना उन्हाळी धान पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये साेनापूर, कृष्णनगर, वाघदरा, विक्रमपूर, गाैरीपूर व पेटतळा आदी सहा मायनरचा समावेश आहे.
दाेन मायनरमध्ये पीकच नाही चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण्यास प्रशासन तयार हाेते; परंतु शेतकऱ्यांनी ऐनवेळी पिकाची लागवड केली नाही. सध्या पीक लागवड केलेल्या क्षेत्रासाठी पाणी साेडले जात आहे.
धरणात पाणीसाठा किती?- मागील वर्षीच्या पावसाळ्यात चामाेर्शी तालुक्यात समाधानकारक पाऊस आल्याने दिना धरण पाण्याने १०० टक्के भरले हाेते. खरीप हंगामातही पाण्याचा वापर झाल्याने सध्या ३२ टक्के जलसाठा दिना प्रकल्पात शिल्लक आहे.