नवरात्र विशेष : विदर्भातील अप्रतिम मूर्ती वैरागडात; सौंदर्याची विकासाअभावी उपेक्षावैरागड : वैरागड-करपडा मार्गालगत एका जुन्या पडक्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर १९८२ मध्ये खोदकाम सुरू होते. खोदकाम करीत असताना अचानक सीताराम क्षिरसागर नामक व्यक्तीला एका दगडावर कोरलेल्या मूर्तीवरील हात दृष्टीस पडला. त्यामुळे खोदकाम करणाऱ्यांची उत्सुकता वाढली. त्यानंतर संपूर्ण खोदकाम केल्यानंतर एक स्त्री सौंदर्याने ओतप्रोत भरलेली व आभूषणांनी नटलेली मूर्ती बाहेर पडाली. गावकऱ्यांनी सदर मूर्तीचे नामकरण करून आदिशक्ती असे नाव ठेवले व छोटेसे मंदिर उभारून प्रतिष्ठापना केली. सदर मूर्ती विदर्भातील एकमेव अप्रतिम मूर्ती असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले. मात्र सदर मंदिर शासनाच्या दुर्लक्षामुळे अविकसित राहिले आहे. खोदकाम करून मूर्ती बाहेर काढल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच मूर्ती वस्तूसंग्रहालयात ठेवण्याचा प्रस्ताव त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला होता. परंतु गावकऱ्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. खोदकामस्थळालगतच छोटेसे मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भाविक व भक्तांकडून मूर्तीवर साज चढविला जात असल्याने आदिशक्तीच्या मूर्तीचे सौंदर्य दिवसेंदिवस फुलत चालले आहे. त्यामुळे सौंदर्याची कदर असलेला माणूस अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. वैरागड येथे भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, किल्ला व अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. परंतु दुर्लक्षामुळे ते अविकसित आहेत.अचंबित करणारे सौंदर्य भाविकांसाठी नवलाईचपाच ते सहा फूट उंच असलेल्या दगडावर कोरलेली मूर्ती विदर्भातील अप्रतिम मूर्ती असल्याचे जाणकार सांगतात. सदर मूर्ती टोकदार नाक, धनुष्याकार भुवया, शांत व अर्ध डोळे मिटून तिरकसपणे नम्र पाहत असल्याचे दृश्य (मूर्तीला मेणाचे डोळे लावले आहेत.) चतुर्भूज मूर्तीच्या एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूल, रौद्ररूप, लोंबकळणारी आभूषणे, पायात चाळ, पायालगत ध्यानस्थ बसलेले चार जटाधारी साधू कोरण्यात आले आहेत. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य व तत्कालीन स्थिती सहज लक्षात येऊ शकेल. या तारकेश्वरी मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक त्यामुळेच गर्दी करतात, हे विशेष.
स्त्री शक्तीचे आदिरूप तारकेश्वरी देवी
By admin | Published: October 15, 2015 1:47 AM