विलास चिलबुले लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : मागील दोन वर्षांपासून सोने व चांदी खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या भावातसुद्धा बाजारामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रतितोळे, तर चांदीचे भाव ८७ हजार रुपये प्रतिकिलो आहेत. येत्या काही महिन्यांत सण, उत्सव, लग्न पाहता सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सराफा बाजारपेठेत व्यक्त केला जात आहे.
मधल्या काळात सोने आणि चांदीच्या भावात तेजी-मंदी होती; परंतु आता पुन्हा सोन्याचे भाव वधारले आहेत. विवाहानंतर सोने आणि चांदीची खरेदी खास करून दिवाळीमध्ये केली जाते. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने आणि चांदीच्या भावात आणखी वाढ होऊ शकतो.
बुकिंग फायद्याचे लग्नप्रसंगासाठी गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाकडून सोन्याचे दागिने कमी- अधिक प्रमाणात का होईना खरेदी केले जातात. लग्न समारंभ असतो, ते दिवाळीआधीच सोने-चांदीच्या दागिन्यांचे बुकिंग करतात.
मागणी वाढल्यास पुन्हा वाढू शकतो भाव अर्थशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूची मागणी वाढल्यास भाव वाढतो. त्यामुळे दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होईल. परिणामी, किमतीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोने-चांदीचे भाव काय?महिना सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)१ जून ७२५०० ८५०००१५ जून ७१७०० ८५९००१ जुलै ७१७५० ८४७००१५ जुलै ७३००० ८३८०० १ ऑगस्ट ७१३५० ८७१००१५ ऑगस्ट ७२७०० ८६२००२६ ऑगस्ट ७४३०० ८७०००
"दिवाळीमध्ये ग्राहकांकडून सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे भाव तेजीत असतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे." - अक्षय बेहरे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.
"सोने-चांदीच्या दरात चढउतार ही नित्याचीच बाब असली तरी मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दर वाढले. त्यामुळे सोने घेणे सर्वसामान्यांना अवघडच झाले आहे." - पंकज खरवडे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.