लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने आता शेणखतालाही सोन्याचे दिवस आले आहेत. शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर प्रतिट्रॅक्टर ट्राली दोन हजार रुपयांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. शेतीसाठी लागणारे शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. सद्यःस्थितीत दोन हजार ट्रॉलीने खत मिळत आहे. ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. सध्या उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे शेतकरी रब्बी संपवून शेती मशागत करून खरिपाची तयारी करीत आहेत. सध्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकण्याच्या धावपळीत आहेत. जनावरांची संख्या कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पैसे देऊनही चांगले शेणखत मिळत नसल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
जमिनीला रासायनिक खतांचा अतिरेक होत असून, वर्षभरात दोन पिके घेतली जातात. त्यामुळे जमीन कसदार राहण्यासाठी शेणखत उपयुक्त आहे. मात्र, पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेणखताची टंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील काही मोजके शेतकरी सेंद्रीय शेती करताना दिसून येत आहेत. खरीप हंगामात तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने शेती करून धानाचे उत्पादन घेतले.
वाढत्या किमतीमुळे शेतकरी जनावरे पाळणे बंद केल्याने जनावराची संख्या कमी झाली आहे. शेणखतही दुर्मीळ होत असून चांगले शेणखत मिळत नाही. पर्याय नसल्याने रासायनिक खत वापरावे लागते. त्यामुळे जमिनीचा दर्जा, पोत घसरत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.- विश्वनाथ सोमनकर, शेतकरी, चामोर्शी