कुरखेडा : अनंत काळापासून विशिष्ट भूभागावर वास्तव्य करून, विशिष्ट गोंडीभाषा बोलून तसेच निसर्ग संस्कृतीची जोपासणा करून माणुसकीची शिकवण देणारा गोंडीधर्म हा कोयतूर धर्म होय. गोंडीधर्म हाच मानवता धर्म होय, असे प्रतिपादन आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी केले. वीर बिरसा मुंडा स्मारक समिती बिरसानगर चारभट्टी, बिरसा मुंडा बहुउद्देशीय युवा संस्था बेलगाव व पहांदीपारी कुपार लिंगो गोंडीधर्म प्रचारक महासंघ शाखा मालदुगीच्या संयुक्त विद्यमाने चारभट्टी येथे आयोजित गोंडीधर्म संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महसूल निरीक्षक लोमेश उसेंडी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खुशालसिंग सुरपाम, छत्तीसगडचे सुखरंजन उसेंडी, संदीप वरखडे, अनिल केरामी, रमेश कोरचा, नंदू नैैताम आदी उपस्थित होते. यावेळी संदीप वरखडे यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला खेडेगावचे उपसरपंच दिलीप दर्राे, मरारटोलाचे सरपंच कुमरे, पुराडाचे सरपंच उमेश उसेंडी, रामगडच्या सरपंच वच्छला केरामी, विश्वनाथ तुलावी, यशवंत मांडवे, डॉ. माडकवार, देवसू आतला, पीतांबर बह्याड हजर होते.
गोंडी धर्म हाच मानवता धर्म होय- नंदू नरोटे
By admin | Published: January 05, 2017 1:41 AM