गडचिरोली - शासनाच्या मान्यतेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याने त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारा मजकूर अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर वायरल केला. सदर बाब लक्षात येताच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. संबंधित दोषी व्यक्तीला तत्काळ शोधून त्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भातील शुक्रवारी कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी पत्रपरिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. यावेळी प्र-कुलगुरू चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव तथा लेखाधिकारी डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते. सर्व विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदभरतीवर महाराष्टÑ शासनाने बंदी घातली आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाला आवश्यकता असल्याने व विद्यापीठ अनुदान आयोगाची १२ ब ची मान्यता मिळण्यासाठी मनुष्यबळ गरजेचे आहे. त्यामुळे खास बाब म्हणून महाराष्टÑ शासनाने या विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीस परवानगी दिली. यासंदर्भात कुलगुरू म्हणाले, सदर भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडली जात आहे. गुणवत्तेच्या आधारेच योग्य व पात्र उमेदवारांची संबंधित पदावर निवड करण्यात येणार आहे. मात्र अशा स्थितीत पदभरतीत भ्रष्टाचार होत असल्याचा बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर वायरल करण्यात आला. त्यामुळे आपण पोलिसात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
सदर भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जात असून गैरप्रचारापासून सर्व संबंधितांनी सावध असावे. भ्रष्टाचार होत असल्याच्या संदर्भात पुरावे उपलब्ध असल्यास संबंधितांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही डॉ.कल्याणकर यांनी केले आहे.
बदनामीकारक मजकूर वायरल केल्याच्या प्रकरणाची पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून सोशल मीडियावर मजकूर टाकणाºयाचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. गडचिरोलीचे एसडीपीओ डॉ.सागर कवडे यांनी गुरुवारी विद्यापीठात जाऊन याबाबतची माहिती जाणून घेतली, असेही कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या २० पदांसाठी १७०० अर्ज
महाराष्टÑ शासनाने खास बाब म्हणून गोंडवाना विद्यापीठातील शिक्षक (प्राध्यापक) १५ व शिक्षकेत्तर कर्मचारी २० अशा एकूण ३५ पदांसाठी मंजुरी प्रदान केली. ही भरती प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत शिक्षकेतरच्या २० पदांसाठी तब्बल १ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी दिली.
गैरप्रकार करणा-या कुणाचीही गय केली जाणार नाही- कुलगुरू
सोशल मीडियावर वायरल झालेल्या मजकुरामध्ये विद्यापीठाच्या पदभरती प्रक्रियेत वेगवेगळ्या पदांचे दर ठरलेले असल्याचा उल्लेख आहे. यापूर्वी विद्यापीठात झालेल्या भरतीत एकाच घरचे तीन ते चार लोक एकाचवेळी नोकरीवर लागले. याबाबत सर्वचजण चुप्पी साधून आहेत, असा उल्लेख मजकुरात समाविष्ट आहे. त्यावर आपली भूमिका मांडताना कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर म्हणाले, मागील वेळी काय झाले हे मला माहीत नाही. मात्र यावेळी पदभरती प्रक्रिया १०० टक्के पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावरच होईल. भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाºया कुणाचीही गय केली जाणार नाही, असे डॉ.कल्याणकर यांनी स्पष्ट केले.