संजय तिपाले
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात कोरोनामुळे थांबवावी लागलेली सहायक प्राध्यापक भरती तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या तीन विषय तज्ज्ञांना आता डच्चू देण्यात आला आहे. नव्याने तीन विषय तज्ज्ञ निवडण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया त्याच पदांसाठी आहे, तर नवे विषय तज्ज्ञ नेमण्याचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात सर्वत्र भरती प्रक्रिया बंद आहे; पण एकमेव गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. २४ ते ३० जूनदरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या आहेत. मुलाखत समितीत कुलगुरू, तीन विषय तज्ज्ञ, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षण संचालक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
विद्यापीठाच्या तत्कालीन विद्यापरिषदेने ५ मे २०२० रोजी ठराव घेऊन बाहेरच्या विद्यापीठातील सहा विषय तज्ज्ञांची नावे सुचविण्याचा निर्णय घेतला होता. विद्यापरिषदेने सहा नावे सुचविली. त्यानंतर व्यवस्थापन समितीने त्यापैकी तीन नावे निश्चित केली. ही नावे लिफाफाबंद असून, कुलगुरुंकडे आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर डॉ. श्रीनिवास वरखेडी हे आले. त्यांचाही कार्यकाळ संपला असून सध्या डॉ. प्रशांत बोकारे कुलगुरू आहेत. तीन वर्षांपूर्वी २२ पदांंसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. दरम्यानच्या काळात आणखी ८ जागा रिक्त झाल्याने आता ३० जागांसाठी भरती होत आहे. मात्र, विषय तज्ज्ञांची नावे लिफाफाबंद असताना व भरती प्रक्रियाच पूर्ण झाली तर त्यांची वैधता संपली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुटीच्या दिवशीही मुलाखती
२४ जूनपासून २०२३ पासून पात्र उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया ३० जूनपर्यंत चालेल. २५ रोजी रविवार आहे तर २९ रोजी बकरी ईदनिमित्त शासकीय सुटी आहे. मात्र, या दिवशीही मुलाखती ठेवल्या आहेत.
रिक्त पदांच्या भरतीची सर्व प्रक्रिया नव्याने केली जात आहे. शिवाय कुठल्याही निवड समितीला सहा महिन्यांची मुदत असते, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे नव्याने विषय तज्ज्ञ निवडले. त्यासाठी राज्यपालांकडून परवानगी देखील घेतली आहे.
- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ