गडचिरोली : भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ अंतर्गत स्थानिक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात कौशल्याधारित नवउद्योजक निर्मितीसाठी बिज केंद्र विद्यापीठाच्या ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रास प्रदान करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मणि तिवारी व ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे संस्थापक संचालक तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी १४ जुन २०२३ रोजी नवी दिल्ली येथे सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली.
सदर केंद्रास ५ वर्षे कालावधीत एकूण १० कोटींची आर्थिक सहाय्यता प्राप्त असून त्यातून स्थानिक युवक व नागरिकांना नवउद्योजक म्हणून स्थापित करणे तसेच त्यांना रोजगाराची शाश्वत संधी उपलब्ध करुण देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. या सामंजस्य करारानुसार ट्रायसेफ नवसंशोधनकेंद्र आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रायसेफ अतर्गत बिज केंद्र स्थापन करण्यासाठी वचनबद्ध राहतील.
केंद्राच्या स्थापनेसाठी संयुक्तपणे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणे. जिल्ह्यांचे संसाधन मॅपिंग, संसाधनांच्या आधारे मूल्य साखळी समजून घेणे, कौशल्यांमधील अंतर ओळखणे आणि उद्योगांना विकसित करण्याच्या संधींचा समावेश असेल. प्रकल्प अहवाल हा बियाणे केंद्राच्या स्थापनेचा आधार राहणार आहे.
विविध उपक्रम राबविणार
सदर कौशल्याधारित बिज केंद्राच्या माध्यमातून उपजीविका आधारित उत्पन्न वृंध्दिगत करणे, स्थानिक नैसर्गिक संपदा आधारित गरजेनुसार कौशल्य विकास, गौणवन उपज व वनोषधी आधारित एकत्रित उत्पादन सुविधा केंद्र, उत्पादन विपणन व विक्री व्यवस्थापन, कृषी आधारित उत्पाद व प्रक्रिया गौणवनउपज प्रक्रिया व उत्पादन, परिक्षेत्रातील संबंधित क्षेत्र जसे पर्यटन, जैवविविधता, ड्रोन तंत्रज्ञान, पंचगव्य यांच्या वाढीस वाव देणे, या बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनीष उत्तरवार यांनी कळविले आहे.