लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत, संस्थाने खालसा करत देशामध्ये इंग्रजानी एकछत्री अंमल केला. सगळीकडे इंग्रज राजवट होती. या देशातील नागरिकांना गुलामीचे जीवन जगावे लागत होते. अशास्थितीत जनतेत स्वाभिमान, अस्मिता निर्माण होण्यासाठी १८५७ चा उठाव कारणीभूत ठरला. गोंडवानाच्या गडामंडलाचा राजा शंकरशहा आणि त्याचा पुत्र रघुनाथशहा यांनी उत्तर गोंडवानामध्ये इंग्रजाविरूद्ध प्रथम उठाव केला आणि पाहता-पाहता सगळीकडे इंग्रजांविरूद्ध युद्धाची ठिणगी पेटली. १८५७ चा उठाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला. १८५७ च्या उठावाचे लोण सगळीकडे पसरल्याने शेवटी दक्षिण गोंडवानामध्ये राजकुमार बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश फौजेला सळो की पळो करून सोडले. अनेकदा ब्रिटिश सेनेचा पराभव केला आणि भारत मातेच्या रक्षणासाठी २१ आॅक्टोबर १८५८ ला हसतहसत फासावर गेले.त्यांचा आज शहीद दिन.क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ मधे अहेरी तालुक्यातील किष्टापूर (मोलमपल्ली) येथील राजवाड्यात पुलेश्वर शेडमाके आणि सुरजा कुंवर यांच्यापोटी झाला. १३ मार्च १८५८ ला घोसरी येथे बाबुरावांच्या सैन्याने ढाल, तलवार, तीरकमठे घेवून इंग्रजांवर आक्रमण केले. त्यात अनेक इंग्रज सैनिक ठार झाले. बाबुराव व त्यांच्या साथीदारांनी २९ एप्रिल १८५८ ला इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला. यामधे कॅप्टन हॉल, कॅप्टन गार्टलॅन्ड हे ठार झाले. बाबुरावांनी १५ सप्टेंबर १८५८ ला वैनगंगेच्या तारसा घाट पार करणाºया अनेक इंग्रज सैनिकांचे मुंडके छाटले. त्यानंतर वीर बाबुराव अहेरी येथे राजवाड्यात दाखल झाले. याची माहिती इंग्रजांच्या गुप्तहेरांना काही कपटी लोकांनी दिली. कॅप्टन शेक्सपिअर हा फौजेसह राजवाड्यात दाखल झाला. बाबुरावांनी इंग्रजांच्या सैैन्यावर चाल केली. परंतु ते इंग्रजांच्या ताब्यात सापडले. बाबुरावांना अटक केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. त्याच्यावर बंडखोरी आणि इंग्रजांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. न्यायव्यवस्थेने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. २१ आॅक्टोबर १८५८ ला सायंकाळी ४:४० मिनिटांनी चंद्रपूर येथील कारागृहाच्या पटांगणावरील पिंपळाच्या वृक्षावर वीर बाबुराव शेडमाके या वीर सुपुत्राला खुलेआम फाशी देण्यात आली. गोंडवानाचा क्रांतिवीर हसतहसत फासावर गेला. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी गोंडवानात स्वातंत्र्यसंग्रामातील आक्रोशाची ज्योत पेटविली होती. गोंडवानाच्या या वीर शहिदाचा २१ आॅक्टोबर हा १६० वा शहीद दिन त्यांच्या विविध पराक्रमांची स्मृती आजही जागृत करीत आहे.
गोंडवानात वीर बाबुरावांनी पेटविली स्वातंत्र्यसंग्राम ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:36 PM
इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत,
ठळक मुद्देइस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले.