ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमच वैरागड : आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा योजनेवर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सदर योजना अपुरी असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही वॉर्डातील नळधारकांना पिण्याचे पाणीदेखील मिळणे कठीण झाले आहे. वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गोरजाई डोहावर नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून नव्या पाणी योजनेचा प्रारूप आराखडा तयार केला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत वैरागड येथे वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्याबाबत वैरागड ग्राम पंचायतीला पत्र प्राप्त झाले होते. मात्र पाणी योजना पुढे सरकली नाही. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी गोरजाई डोहाच्या काठावर जागा नियोजित करण्यात आली. मात्र अद्यापही भूमिपूजनाचा मुहूर्त गवसला नाही. जुन्या पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी ७५ हजार लीटर क्षमतेची होती. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे पूरक पाण्याची टाकी बांधण्यात आली. दोन-तीन वर्षांपूर्वी भोयर यांच्या घराजवळ ग्राम पंचायतीच्या मालकीच्या जागेत १५० हजार लीटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र वैरागड येथे जुनीच नळ पाणीपुरवठा योजना असल्याने गावात काही वॉर्डात बारमाही पाणी संकट निर्माण झाले आहे. यावर्षात नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. दरम्यान नदीपात्रात खड्डे करून पिकाला पाणीपुरवठा करीत असल्याने नदीपात्रातील जलसाठा आटला. त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर पूर्णत: भरण्यास दोन दिवसाचा कालावधी लागत आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून ज्यांच्याकडे टिल्लूपंप आहे. त्यांना अधिक पाणी मिळते. मात्र इतर लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावातील नागरिक नाराज आहेत. (वार्ताहर) आमदारांनी लक्ष देण्याची गरज वैरागड हे गडचिरोली जिल्ह्यातील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या मागील काही वर्षात वाढली आहे. गावालगतच्या नदीवर गोरजाई डोह असून यावर आधारित नवी पाणीपुरवठा योजना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आ. क्रिष्णा गजबे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. काय म्हणतात, ग्रामसेवक! वैरागड गावात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत असून पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. यासंदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने वैरागड ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाणीटंचाईबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही, असे सांगितले.
गोरजाई डोहावरील पाणी योजना वाऱ्यावर
By admin | Published: April 15, 2017 1:37 AM