"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद
By संजय तिपाले | Published: December 17, 2023 08:14 PM2023-12-17T20:14:17+5:302023-12-17T20:14:45+5:30
भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली.
गडचिरोली : तुला सायकल चालवता येते ना, नसेल तर शिकून घे... सायकल मिळाली आता रोज शाळेत जायचं अन् चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनायचं... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित नारगुंडा (ता.भामरागड) येथील पोलिस मदत केंद्रात आयोजित जनजागरण मेळाव्यात आदिवासी विद्यार्थिनींशी संवाद साधून प्रोत्साहन दिले.
भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक बापूराव दडस हे उपस्थित होते. पारंपरिक आदिवासी रेला नृत्य सादर करुन स्वागत झाले.
यावेळी पाेलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर सुरक्षा गार्ड, पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बॅरेकची उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. जनजागरण मेळाव्यात आदिवासींना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, स्प्रे पंप, शालेय मुलांना सायकल, क्रिकेट किट, व्हॉलिबॉल व नेट, ड्रेस, लोणचे पापड किट, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, धोतर, टी-शर्ट, लोअर, ब्लॅकेट, स्वेटर, बेडशिट, महिलांना साड्या व इतर भेटवस्तूंचे वाटप केले.
यावेळी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काही मुलांना त्यांनी पाढे म्हणतात येतात का, असा प्रश्नही केला. आदिवासींशीही त्यांनी संवाद साधला. रेशन व आरोग्य सुविधा मिळतात का, अशी विचारणा केली. आपल्या भाषणात त्यांनी जिल्हा पोलिस दल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत असल्याचा उल्लेख करुन दुर्गम -अतिदुर्गम भागाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी केले तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, नारगुंडाचे प्रभारी अधिकारी सतीश बेले व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
२०२२ मध्ये स्थापन करण्यात केलेल्या सुरजागड येथील पोलिस मदत केंद्रालाही त्यांनी भेट दिली. तेथे त्यांनी जवानांशी संवाद साधला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
धर्मरावबाबांनी साधला गोंडी भाषेत संवाद -
नारगुंडा पोलिस मदत केंद्राच्या जनजागरण मेळाव्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंडी भाषेत भाषण केले. त्यांनी आदिवासींना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. राज्य सरकार आदिवासींच्या विकासासाठी कटीबध्द असून नवनवीन उद्योग येत आहेत, यातून रोजगार मिळत आहे, त्यामुळे मागास भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.