सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयी शासनाने विविध विभागांसाठी अनेक वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून शासकीय इमारती बांधल्या; मात्र या इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने बऱ्याच इमारती जीर्णावस्थेत आहेत. त्यामुळे इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
सिरोंचा येथे गेल्या काही वर्षात शासनाने बऱ्याच इमारती बांधल्या; परंतु या इमारतींची योग्य देखभाल व काळजी न घेतल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेल्या अनेक इमारती सध्या मोडकळीस आल्या आहेत. सरकारला जनतेकडून कराच्या रूपात निधी उपलब्ध होत असतो. या निधीचा उपयोग लोकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारच्यावतीने केला जाताे; परंतु स्थानिक स्तरावर याेग्य उपाययाेजना व अंमलबजावणी हाेत नसल्याने शासकीय मालमत्ता निरुपयाेगी ठरते. सिराेंचा येथील इमारतींची देखभाल करण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे काही इमारतीच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे. शासनाच्यावतीने विविध योजनेतून तालुका मुख्यालय काही नवीन इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतींचे नूतनीकरण केल्यास शासनाच्या निधीची बचत होऊ शकते, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.