औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पहिल्यांदा २०१५ च्या आॅगस्ट महिन्यात सकारात्मक पाऊल उचलले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्यातील तसेच पूर्व विदर्भातील खासदारांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाबाबत चर्चा करण्यात आली. या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे गृहमंत्र्यांनीच स्पष्ट केले. त्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत मुंबईत बैठक घेऊन उद्योगांबाबत चर्चा केली होती. तसेच याच वर्षात लंडन येथे मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांनी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भेट घेऊन त्यांनाही गडचिरोली जिल्ह्यात उद्योग टाकण्यासाठी सूचविले. उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘मेक इन गडचिरोली’वर चर्चासत्र आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. याला उद्योग क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. हेडरी भागात नव्याने पोलीस स्टेशन उभारणीमागेही उद्योगासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोलीसह इतर तालुका मुख्यालयातही औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्गांना मंजुरी देण्यात आली. पुढील पाच वर्षात ही कामे पूर्ण होतील.
सूरजागडसाठी सरकार आग्रही; दिल्लीत बैठक
By admin | Published: December 27, 2015 1:45 AM