यावेळी गडचिरोलीचा पदभार घेतलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांनी गेल्या तीन वर्षात गडचिरोलीच्या परिवहन कार्यालयात झालेल्या आमूलाग्र बदलासाठी भुयार यांची कार्यप्रणालीच कारणीभूत असल्याचे सांगितले. गडचिरोलीतील कार्यालयाची अवस्थेबद्दल मला अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण आज हे कार्यालय इतर कार्यालयांसाठी दिशादर्शक झाले आहे. गडचिरोलीला अधिकारी मिळत नव्हते; पण आज अनेक जागा भरल्या आहेत याचे समाधान वाटते, असे चव्हाण म्हणाले. प्राचार्य खालसा यांनी आपण अनेक देशात फिरलो; पण भुयार यांच्यासारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पहायला मिळाले नाही, असे प्रशंसोद्गार काढले.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक एस.एन. उचगावकर, सिद्धांत वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन हर्षल बदखल यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
..तरच निवृत्तीनंतरचे जीवन होईल सुखी
कार्यालयात आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो त्याचे पडसाद आपल्या आयुष्यात उमटतात. शासन म्हणजे शोषण असे आलेल्या माणसाला वाटायला नको. या जिल्ह्यातील लोक साधे आणि माणुसकी जपणारे आहेत. सिरोंचासारख्या दुसऱ्या टोकावरून आलेल्या माणसाचे काम आधी कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. संवेदना जागृत ठेवल्या तर हे शक्य आहे. आपल्याकडे आलेली व्यक्ती आनंदाने परत गेली तरच आपले निवृत्तीनंतरचे जीवन सुखी होईल, असे यावेळी परिवहन अधिकारी भुयार म्हणाले.
(बॉक्स)
चंद्रपूरचे कार्यालयही असेच करणार
यावेळी सर्वच वक्त्यांनी गडचिरोलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रचनेसह या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी लावलेले फलक, स्वच्छता याचे श्रेय परिवहन अधिकारी भुयार यांना दिले. चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी आपल्याला भुयार यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आता त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या कार्यालयाच्या रचनेतूनही काही गोष्टी घेऊन चंद्रपूर कार्यालयात तसा बदल करणार असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.