अशोक नेते यांचे प्रतिपादन : आरमोरीत भाजपच्या तालुका कार्यकारीणीची बैठकआरमोरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारकडून विकासाबाबत कठोर पावले उचलली जात आहेत. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. भाजपप्रणित सरकारच झपाट्याने विकास करू शकते, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.आरमोरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात भाजपच्या आरमोरी तालुका कार्यकारीणी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक रविवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार क्रिष्णा गजबे, भाजपचे पदाधिकारी प्रमोद पिपरे, रामभाऊ पडोळे, तालुका प्रभारी रामेश्वर सेलूकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, सदानंद कुथे, सरचिटणीस रवींद्र बावणथडे, महिला आघाडीच्या प्रमुख रेखा डोळस, तालुका अध्यक्ष नंदू पेटेवार, रवीकिरण समर्थ, भारत बावणथडे, सुनिल नंदनवार, ज्योत्स्ना बैस, मनिषा गेडाम, प्रदीप हजारे, पंकज खरवडे, भाईचंद्र गुरनुले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, भाजपात गटबाजीला मुळीच थारा देऊ नका, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी यावेळी केले. पक्ष संघटन व नियोजन जि.प. व पं.स. निवडणुकीत अतिशय महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. आमदार क्रिष्णा गजबे यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने दोन वर्षाच्या कालावधीत विविध विकासकामे केली. सदर विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे आमदार गजबे म्हणाले. बैठकीला आरमोरी तालुक्यातील भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विकासाबाबत सरकारकडून कठोर पावले
By admin | Published: November 07, 2016 1:43 AM