मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या राजधानीपासून सर्वाधिक लांब आणि एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येत आहेत. खरं तर या जिल्ह्यात व्हीव्हीआयपी लोकांना येताना अनेक अडचणी असतात. प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. मात्र तरीही मुख्यमंत्री, राज्यपाल योग्य वेळ पाहून आल्याशिवाय राहात नाही.ज्यांच्या हाती राज्याची धुरा असते असे मोठे व्यक्तिमत्व जिल्ह्यात आले म्हणजे या जिल्हावासियांच्या आशा पल्लवित होतात. काहीतरी नवीन घोषणा होते का, या जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस काही केले जाते का, आरोग्याची समस्या, बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जातील का, अशा एक ना अनेक आशावादी विचार या जिल्हावासियांच्या मनात डोकावत असतात. मात्र दुर्दैवाने बहुतांश वेळा निराशाच पदरी पडते. आजही हा जिल्हा देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांच्या यादीत मोडत आहे. आकांक्षित जिल्हा या नात्याने गडचिरोलीला विशिष्ट मुद्द्यांच्या आधारावर विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली, पण त्याचे सकारात्मक परिणाम आजतरी ठोसपणे पहायला मिळत नाही.जवळपास १६ ते १७ वर्षाआधी या जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम आणि मागास तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याला तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी भेट दिली. एका मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी भामरागड तालुक्याला दत्तक घेण्याचे जाहीर केले. आता भामरागडचा कायापालट होणार म्हणून समस्त तालुकावासिय हरखून गेले होते. पण राज्यपालांच्या कल्पनेतील दत्तक भामरागड कसे होते हे कोणालाच कळले नाही. आजही रुग्णांना खाटेवरूनच आणले जात आहे. पुढे मोहम्मद फैजल यांच्या रुपाने दुसºया राज्यपालांचे पाय भामरागडला लागले. त्यांनीही अधिकारी, नागरिकांशी चर्चा केली, मात्र आजही अनेक गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. २००९ मध्ये एस.सी. जमीर हे तिसरे राज्यपाल भामरागडला आले. पण परिस्थितीत फरक पडला नाही. २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भामरागडला भेट देऊन पर्लकोटा नदीवर उंच पूल उभारण्याचे आश्वासन दिले होते, पण आजही शेकडो गावांना पर्लकोटाच्या पुलामुळे संपर्काबाहेर राहावे लागते.राज्यपाल के.विद्यासागर राव मेडिगड्डाच्या भूमिपूजन, लोकार्पणाला आले, मात्र सिरोंचा किंवा इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना आजही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सर्वाधिक वेळ या जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड केला. मात्र त्यांनी कुदळ मारलेला कोनसरीचा लोहखनिज प्रकल्प सुरू झाला नाही, ना त्यांनी लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी चाबी वाटप केलेले ट्रक धावताना दिसत नाही. बेरोजगारीचे चºहाड दिवसागणिक वाढतच आहे. आता राज्यपाल कोश्यारी यांची भेट याच परंपरेला पुढे चालवणारी ठरू नये, एवढीच अपेक्षा.अधिकारी व नागरिकांशीही साधणार संवादगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच येत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोली येथील नियोजन भवनात दुपारी २.२० वाजता सरकारी अधिकाºयांसह काही नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या चर्चेत ते जिल्ह्यातील प्रमुख समस्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी सकाळी १० वाजता आलापल्ली येथे हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर सर्वप्रथम उडान सौरउर्जा पॅनल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित एकलव्य मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम आटोपून राज्यपाल गडचिरोलीतील महिला रुग्णालयातील विविध सुविधांची पाहणी करून तेथील डॉक्टर व कर्मचाºयांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २.२० वाजता नियोजन भवनात जाणार आहेत.
राज्यपाल महोदय, आता परंपरा मोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 6:00 AM