अमिर्झात निरोप समारंभ : केंद्रातील शाळांच्या प्रगतीबाबत व्यक्त केले समाधान शहर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप व अमिर्झा केंद्रातील जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांचे इतरत्र समायोजन झाल्याने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ मंगळवारी अमिर्झा येथील केंद्र शाळेत पार पडला. अमिर्झा केंद्राच्या वतीने सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान बेलगाव जि. प. शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक टी. जी. खोब्रागडे, टेंभाचे मुख्याध्यापक एस. एम. बारसागडे, मरेगावचे मुख्याध्यापक पी. डी. भैसारे यांना निरोप देण्यात आला. मुख्याध्यापकांचे इतरत्र समायोजन झाल्याने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. समारंभात केंद्रातील शिक्षकांच्या वतीने शिक्षक अलोणे व शिक्षिका चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे व केंद्रातील मुख्याध्यापकांनी शाळांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे अमिर्झा केंद्रातील अनेक शाळा डिजिटल झाल्या व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ झाली, असे मनोगत शिक्षकांनी व्यक्त केले. अमिर्झा केंद्रात प्रथमच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व नवीन पायंडा घालण्यात आला, असे प्रतिपादन सत्कारमूर्तींनी केले. संचालन कुनघाडकर यांनी केले. केंद्रप्रमुख किशोर चव्हाण यांच्या नेतृत्त्वात मुख्याध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांनी सहकार्य केले.
गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 1:28 AM