: तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध ज्वलंत समस्या १५ दिवसाच्या आत मार्गी लावाव्या अन्यथा चक्का जाम आंदोलन करणार, असा इशारा
कोरची तालुका सरपंच संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरची तालुक्यात एकूण २९ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे अंतर्गत स्ट्रीट लाइटचे बिल शासनस्तरावरून भरण्यात यावे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प तालुका कोरची येथे रिक्त असलेले अंगणवाडी पर्यवेक्षकांचे पद भरण्यात यावे, ग्रामपंचायतमधील सर्व पदाधिकाऱ्यांना पंचायत समितीमध्ये बैठक व्यवस्था करण्यात यावी, सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी व शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे, मसेली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था करावी, २५/१५ व ३०/५४ हा निधी ग्रामपंचायत स्तरावर वळता करण्यात यावा, मनरेगा वैयक्तिक सिंचन व सार्वजनिक सिंचन विहिरींचा निधी पंचायत समितीला जमा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदाेलन करण्यात येणार आहे.
समस्यांचे निराकरण १५ दिवसांच्या आत न झाल्यास सरपंच संघटना कोरचीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोरची तालुक्यातील सरपंच संघटनेतील अध्यक्ष धनिराम हिडामी, सचिव दिलीप केरामी, कोषाध्यक्ष विरेंद्रकुमार जांभूळकर, संघटक सुनील सयाम, प्रेमदास गोटा, उपसरपंच अस्वल हुडकी, उपसरपंच तुलावी यांनी दिला आहे.