देसाईगंज तालुक्यातील बहुतांश गावात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धानाची रोवणी केली. यासाठी शेतकऱ्यांना नांगरणी, चिखलणी, खत व धान रोवणीसाठी मजुरी खर्च करावा लागला. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे चालू खरीप हंगामातील धानाची विक्री आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकन काढली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी धानाची विक्रीसुद्धा केली. परंतु ३ फेब्रुवारीनंतर विक्री केलेल्या धानाचे चुकारे (रक्कम) अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सोबतच आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची तीन महिन्यांपासून उचल न झाल्याने गोदाम फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही टोकनधारक शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी लवकर धानाची उचल करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बाॅक्स
उचल न झाल्यास उन्हाळी धान ठेवणार कुठे?
चालू खरीप हंगामातील खरेदी केलेल्या गोदामामधील धानाची लवकर उचल झाली नाही तर येणाऱ्या रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी खरेदी-विक्री संस्था गोदाम कुठून उपलब्ध करणार, असा प्रश्नही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे रबी हंगामातील आधारभूत धान खरेदी करण्यास गोदामाअभावी अडचणी येऊ शकतात. याचा फटका रब्बी हंगामातील धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेले खरेदी केंद्र चालविण्याची मुदत ३१ मार्चला संपणार असल्याने काही टोकनधारक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान टाळण्यासाठी १ महिन्याची मुदत वाढविण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.