रेशन दुकाने बंद : एटापल्लीसह अनेक तालुक्यांमधील गरीब नागरिक धान्यापासून वंचित गडचिरोली : एटापल्लीसह जिल्ह्याच्या दुर्गम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांना अद्यापही धान्य पुरवठा झालेले नाही. एटापल्ली तालुक्यात ११२ शासनमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी केवळ ३३ दुकानात नवसंजीवनी योजनेंतर्गत रेशनचे धान्य पोहोचले आहे. उर्वरित ७९ दुकानांपैकी फक्त चार दुकानात माहे जुलै महिन्याचे धान्य पोहोचविण्यात आले आहे. तब्बल ७५ दुकानांना १५ जुलैपर्यंत धान्य पोहोचलेले नसल्याने हे सर्व रेशन धान्य दुकान कुलूपबंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने शुक्रवारी जिल्हाभर रेशन धान्य दुकानांवर स्टिंग आॅपरेशन केल्यावर उघडकीस आला. अशीच परिस्थिती कुरखेडासह इतर तालुक्यातही असल्याचे दिसून आले. धान्य पुरवठाच झाले नसल्याने दुकान चालकांनी दुकानांना कुलूप मारून ठेवले आहे. एटापल्ली तालुक्याच्या जीवनगट्टा, गुरूपल्ली येथील चार रेशन धान्य दुकानांना शुक्रवारी दुपारी ११.३० ते १२.३० या वेळेत लोकमत प्रतिनिधीने भेट दिली. हे चारही दुकान कुलूप बंद असल्याचे दिसले. यापैकी जीवनगट्टा येथील पी. वाय. कोरेत यांच्या दुकानाला फलक सुध्दा नव्हता. दुकानाची शासकीय वेळ ठरलेली आहे, असे असले तरी एकही दुकान दुर्गम भागात वेळेचे पालन करीत नाही. पैसे असेल तेव्हा माल उचलतो व आपल्या सोयीनुसार तो वाटप करतो, असा प्रकार असल्याचे नागरिकांकडून माहिती घेतल्यावर दिसून आले. चार-पाच दिवसात माल वाटप केला जातो. याच काळात दुकान उघडी ठेवली जातात. सर्व दुकानदारांची साखळी पध्दत या तालुक्यात आहे. एटापल्ली येथील गीता दासरवार यांनी ग्राहक केव्हाही आले तरी आम्ही वेळ पाहत नाही. त्यांना धान्य देतो, असे सांगितले. रेशन कार्ड धारकांना नियमित माल मिळतो. परंतु तारीख ठरलेली नसते. एखादी तारीख निश्चित करून त्या तारखेलाच मालाचे वितरण व्हायला हवे, अशी मागणी लोकमत प्रतिनिधीकडे नागरिकांनी केली. तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांच्या वाहनाने माल पोहोचून दिल्या जातो. दोन दिवसांपासून वाहनचालकांचा संप असल्याने रेशन पोहोचले नाही, अशी माहिती एटापल्ली तहसील कार्यालयाचे पुरवठा निरिक्षक आनंद पडोळे यांनी दिली.
जिल्ह्यात धान्य पोहोचलेच नाही
By admin | Published: July 16, 2016 1:35 AM