चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. जिल्ह्यातील बऱ्याच गावात कोरोनाकाळातही नियोजित जागीच बाजार भरविला जात आहे. मात्र आष्टी येथील बाजार हा नियोजित जागेवर न भरता बालाजी टाऊनच्या रस्त्यावर भरत आहे. त्याठिकाणी पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार करण्यासाठी चिखलातून पाय तुडवीत जावे लागते. बाजार संपल्यावर सायंकाळी खराब भाजीपाला व्यापारी त्याच ठिकाणी फेकून देत आहे. त्यामुळे परिसरात वास्तव्याने असणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
आठवडी बाजारातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. मात्र सध्या इतरत्र बाजार भरत असल्याने ग्रामपंचायतीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ग्रामविकासावर याचा परिणाम होत आहे. याकडे ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस विभागाने लक्ष देऊन सदर आठवडी बाजार हा नियोजित जागीच भरविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.