११ तालुके माघारले : पाणीकर वसुली थंडबस्त्यात गडचिरोली : पाणी पुरवठ्याच्या सेवेसाठी ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे दरवर्षी पाणी कराचा भरणा करावा लागतो. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती पाणी कर वसुलीत प्रचंड माघारल्या आहेत. अद्यापही ग्रामपंचायतींकडे जुनी थकीत व नव्या चालू वर्षाची मिळून एकूण २ कोटी ८ लाख ८० हजार ९२५ रूपये पाणी करापोटी थकीत असल्याची माहिती हाती आली आहे.गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीकडे ३१ मार्च २०१६ अखेर पाणी करापोटी एकूण ८ लाख ३२ हजार १६० रूपये थकीत होते. आरमोरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीकडे ८ लाख १० हजार, देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीकडे ९ लाख ८८ हजार ९४२, कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीकडे ८ लाख ६५ हजार ६०, कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीकडे १ लाख २१ हजार ६०१, धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीकडे ४ लाख ८ हजार ८९४, चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीकडे २३ लाख ६ हजार ३८०, मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रा. पं. कडे ३ लाख ९५ हजार ११०, अहेरी तालुक्यातील ३९ ग्रा. पं. कडे ११ लाख ७५ हजार, एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रा. पं. कडे २ लाख ५० हजार २७७, सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रा. पं. कडे ११ लाख व भामरागड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीकडे १ लाख ७६ हजार ८०५ रूपये पाणी करापोटी ३१ मार्च २०१६ अखेर थकीत होते. यापैकी केवळ चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीने यावर्षात पाणी कराची वसुली केली आहे. इतर ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणी कर वसुलीकडे प्रचंड कानाडोळा केला आहे. बाराही तालुक्यातील एकूण ४५६ ग्रामपंचायतीकडे मागील थकबाकी व सन २०१६-१७ या चालू वर्षाची मिळून एकूण २ कोटी १६ लाख ३५ हजार ८०२ रूपये पाणी करापोटी शिल्लक आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने ग्रामपंचायतीची पाणी कर वसुली थंडबस्त्यात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चामोर्शी तालुका आघाडीवरचामोर्शी तालुक्यात एकूण ७५ ग्रामपंचायती आहेत. ३१ मार्च २०१६ अखेर ग्रामपंचायतीकडे २३ लाख ६ हजार ३८० व सन २०१६-१७ या चालू वर्षाची ६५ लाख ३० हजार ९६० रूपये अशी एकूण ८८ लाख ३७ हजार ३४० रूपये पाणी कराची मागणी होती. यापैकी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी १ लाख ६७ हजार ९१ रूपयांची जुनी थकीत कर वसुली केली. तसेच सन २०१६-१७ या चालू वर्षाची एकूण ५८ लाख ७ हजार ७८६ रूपयांची वसुली केली. चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पं. नी यावर्षात एकूण ७५ लाख ४ हजार ८७७ रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी ८.५४ आहे. उर्वरित ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चालू आर्थिक वर्षात पाणी कराची मुळीच वसुली केली नाही. पाणी कर वसुली चामोर्शी तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. पाणी कर मागणी निश्चित करण्याची कार्यवाही सुरूचराज्य शासनाच्या निर्देशानुसार विहीत कालावधीत नव्याने पाणी कराची आकारणी करणे गरजेचे होते. मात्र केवळ चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सन २०१६-१७ या चालू वर्षात नव्याने पाणी कराची आकारणी करून काही प्रमाणात वसुली केली. मात्र इतर ११ तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतींनी अद्यापही पाणी कराची नव्याने आकारणी केली नाही. पाणी कराची मागणी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे, असा अहवाल ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती प्रशासनामार्फत जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे ११ तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार प्रचंड ढेपाळला आहे, असे दिसून येते. पाणी कर वसुली संदर्भात ग्रा. पं. नी प्रभावी जनजागृती केली नाही.
ग्रामपंचायतींकडे एकूण २ कोटी ८ लाख थकीत
By admin | Published: July 07, 2016 1:21 AM