चामोर्शी : चालु वित्तीय वर्षाची पहिली ग्रामसभा शुक्रवारला ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली. सभेदरम्यान गाव विकासासंदर्भातचे अनेक ठराव चर्चेअंती पारित करण्यात आले. सरपंच मालनताई बोदलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती देणे, प्राप्त पत्रांचे वाचन करणे, महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी आराखडा तयार करणे, विविध विकास योजनेंतर्गत कामाची निवड, इंदिरा आवास योजना, बैलजोडी, सिंचन विहीर व अन्य लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या जमाखर्चाची प्रत प्रत्येक ग्रामसभा सदस्यांना घरपोच देण्यासंदर्भात ठराव झाला असतांनाही ही प्रत देण्यात आली नाही. यावरून सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे सुरू असतांना गोंधळ निर्माण झाला. गोंधळाच्या वातावरणातच ग्रामसभा पुढे रेटून अनेक ठराव पारीत करण्यात आले. ग्रामसभेला उपसरपंच नागोबा पिपरे, पं. स. सदस्य नेताजी तुरे, ग्रा. पं. सदस्य शोभा तुरे, विजय शातलवार, अविनाश चौधरी, सोपान नैताम, राहुल नैताम, सुमेध तुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवीशंकर बोमनवार, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, स्वप्नील वरघंटे, माणिकचंद कोहळे, ताराबाई साखरे, गंगाधर गण्यारपवार, ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर, छायाताई कोहळे, क्षेत्रसहाय्यक पेंपकवार, श्रीकांत ओल्लालवार, सुरेश कागदेलवार, मारोतराव सोमनकर, केशव उंदीरवाडे, ऋषीदेव पिपरे, विजय साखरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यात नक्षल्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद पोलीस शिपाई रोशन डंबारे यांच्या स्मृतीपित्यर्थ शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
ग्रामसभेत अनेक ठराव पारित
By admin | Published: May 23, 2014 11:54 PM