चौकशीनंतर निर्णय : एम. एल. शेंडे यांनी केला लाखो रूपयांचा गैरव्यवहार लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक एम. एल. शेंडे यांनी ग्रामपंचायतीतील ५ टक्के अंबध निधी योजनेच्या रकमेची रोकडवहीत नोंद करून प्रमाणके उपलब्ध नसताना या निधीसह विविध शासकीय योजनेच्या रकमेची अफरातफर करून लाखो रुपयांच्या निधी हडप केल्याप्रकरणी ग्रामसेवक शेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आलापल्ली ग्रामपंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असून या ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र ग्रामसेवक एम. एल. शेंडे यांनी ५ टक्के अबंध निधी योजनेच्या रोकडवहीत नोंद करून प्रमाणके उपलब्ध नसताना रकमेची अफरातफर केली. तसेच ५ टक्के अबंध निधीच्या रकमेची परस्पर स्वत: धनादेशाद्वारे व आरटीजीएसद्वारे स्वत:च्या खात्यात जमा करून लाखो रुपयांच्या शासकीय रकमेची अफरातफर केल्याचे अहेरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी सादर केलेल्या दोषारोपत्रावरून निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या निधीची अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवक एम.एल. शेंडे यांना खुलासा मागितला होता. मात्र, शेंडे यांनी खात्रीलायक कोणतेही पुरावे सादर केले नाही. त्यामुळे ग्रामसेवक शेंडे हे शासकीय रकमेची अफरातफर करण्यास जबाबदार असल्याचे स्पष्ट होताच, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्याकडे सादर करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक शेंडे यांना निलंबित केले. यासाठी जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी पाठपुरावा केला. या संदर्भात आलापल्ली ग्रामसभेत चर्चा होऊन ग्राम विकास अधिकारी शेंडे यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव सुध्दा घेण्यात आला होता.
आलापल्लीचे ग्रामसेवक निलंबित
By admin | Published: May 18, 2017 1:37 AM