कामकाज ठप्प : गडचिरोली एसडीओ व पंचायत समिती कार्यालय परिसरात धरणे; विविध प्रलंबित मागण्यांवर महसुल कर्मचारी आक्रमक गडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवक, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवकांनी पंचायत समिती परिसरात तर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय कार्यालय परिसरात एक दिवशीय धरणे आंदोलन केले. यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प पडले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती परिसरात धरणे देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष जे. सी. ठाकरे, सचिव पी. पी. निंदेकर, कोषाध्यक्ष मंगल डाखरे, उपाध्यक्ष कोटगीरवार, सी. के. खुणे, मंगर, आखाडे, सहारे, बारसागडे, डोंगे, त्रिशुलवार, साईनाथ कासटवार, खोब्रागडे, डाकराम ठाकरे, किन्नाके, दुपारे, सिडाम, कळांबे, मच्छेवार आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्ष सेवा कालावधी नियमित करण्याचा निर्णय घ्यावा, ग्रामसेवकांना दरमहा तीन हजार रूपये प्रवासभत्ता देण्यात यावा, लोकसंख्येनुसार साजे व पदे निर्माण करण्यात यावी, १२ जून २०१३ चे फौजदारी परिपत्रक मागे घ्यावे, आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. तलाठी साजा व महसूल मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करण्यात याव्या, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर पुरवून पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौणखनिज वसुलीच्या कामातून तलाठ्यांना वगळण्यात यावे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे मंजूर करावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने एसडीओ कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मंडळ अधिकारी पी. ए. डांगे, जी. डी. सोनकुसरे, एच. एम. राऊत, तसेच तलाठी बी. ए. बांबोळे, ए. आर. तुनकलवार, एस. एस. लाडवे, डी. एस. डोंगरे, व्ही. आर. कुमरे, महेश गेडाम, जी. जी. खांडरे, आर. पी. सिडाम, जंवजाळकर, गेडाम, जांगी, चौधरी, टेंभुर्णे, हजारे, कुळमेथे, काटकर, ढोरे आदी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हाभरातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आंदोलनावर
By admin | Published: November 08, 2016 1:30 AM