आंदोलन : बीडीओंना भारमुक्त करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. परंतु त्यांना अजूनपर्यंत भारमुक्त करण्यात आले नाही. त्यांना तत्काळ भारमुक्त करावे, या मागणीसाठी ग्रामसेवकांनी पाक्षिक सभेवर बहिष्कार टाकला. संवर्ग विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे हे ग्रामसेवकांना नाहक त्रास देतात, असा आरोप करून ग्रामसेवकांनी ३ एप्रिलपासून असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सपाटे यांचे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे स्थानांतरण केले. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना अजूनपर्यंत भारमुक्त केले नाही. त्यामुळे सपाटे हे अजूनही धानोरा येथेच कार्यरत आहेत. ही एकप्रकारची शासनाच्या निर्णयाची अहवेलना आहे, असा आरोप करीत ग्रामसेवकांनी मंगळवारी आयोजित पाक्षिक सभेवर बहिष्कार टाकला. यापूर्वी वर्ग १ चे अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यानंतर त्यांना भारमुक्त करून त्यांचा प्रभार नजीकच्या बीडीओंकडे देण्यात आला होता. सपाटे यांनाही भारमुक्त करून धानोरा पंचायत समितीचा प्रभार दुसऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी केली. सपाटे यांचे तत्काळ स्थानांतरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.
पाक्षिक सभेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:27 AM