अहेरी : राज्यातील २४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या बीएड् महाविद्यालयांना अनुदान मिळावे, अशी मागणी विनाअनुदानित शिक्षणशास्त्र प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व प्रधान सचिव गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर २००१ च्या पूर्वीच्या बीएड् महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित असा शब्द नसल्याने अशा महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने सन २०१३ मध्ये सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यानुसार त्यांनी या सर्व महाविद्यालयांकडे प्रस्ताव मागणी केली. आणि महाविद्यालय प्रस्ताव सुद्धा सादर केले. त्यानुसार आता शासनाने त्यावर सकारात्मक कारवाई करुन २००१ पूर्वीच्या ७१ महाविद्यालयांना अनुदान द्यावे. या महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी विनाअनुदानित बीएड् महाविद्यालय असोसीएशनच्या वतीने खा. धैर्यशील माने यांच्या नेतृत्वात अहेरी येथील भगवंतराव बीएड् महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. सोनोने व इतर पदाधिकाऱ्यांनी केली.