गडचिरोली - येथील गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद व अभ्यास मंडळांच्या पहिल्या निवडणुकीत यंग टीचर्स असोसिएशन व महाआघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून भाजपप्रणित अभाविप व शिक्षण मंचचा पराभव केला. गुरुवारी सकाळी अंतिम निकाल जाहीर झाला.
गोंडवाना विद्यापीठाची पदवीधर अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांची निवडणूक १० डिसेंबरला पार पडली. यात भाजप व रा.स्व.संघप्रणीत शिक्षण मंच, सेक्युलर महाआघाडी व यंग टिचर्स असोसिएशन पूर्ण तयारीने कामाला लागले होते. बुधवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. गुरुवारी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरुच होती. त्यात सेक्युलर महाआघाडी व यंग टिचर्स असोसिएशनने विद्यापीठाच्या सर्व अधिसभांवर ताबा मिळविला.
प्राचार्य गटात यंग टिचर्स असोसिएशनचे प्राचार्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ.विवेक शिंदे व प्राचार्य डॉ.एन.एस लडके विजयी झाले. सेक्युलर महाआघाडीचे डॉ.दिलीप जयस्वाल हेही निवडून आले. या आघाडीचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा व प्राचार्य डॉ.सिंग हे आधीच बिनविरोध विजयी झाले होते. व्यवस्थापन प्रतिनिधी गटात गटात केवळ ९० मते होती. त्यातील आठपैकी चार उमेदवारांना निवडून द्यावयाचे होते. यात खुल्या प्रवर्गातून शिक्षण मंचचे मोतीलाल कुकरेजा निवडून आले. अनुसूचित जाती प्रवर्गातून कुणाल घोटेकर, उन्मेश गेडाम व प्रा.देवेश मारोतराव कांबळे उभे होते. त्यात यंग टीचर्स असोसिएशन व महाआघाडीचे प्रा.देवेश कांबळे ४५ मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उन्मेश गेडाम यांना १८, तर कुणाल घोटेकर यांना १५ मते मिळाली.
सर्वांचे लक्ष लागलेल्या पदवीधर गटात शिक्षक महाआघाडीचे १० पैकी ७ उमेदवार निवडून आले. खुल्या प्रवर्गातून शिक्षक महाआघाडीचे अॅड.गोविंद भेंडारकर, अजय लोंढे व प्रशांत ठाकरे विजयी झाले. याच आघाडीचे अनुसूचित जाती गटातून दीपक धोपटे, एनटी गटातून अजय बतकमवार, ओबीसी गटातून सुनील शेरकी व महिला गटातून संध्या शेषराव येलेकर निवडून आल्या. मात्र, विजय कुत्तरमारे, ऋषिकांत पापडकर व अनुसूचित जमाती गटातून रवींद्र नैताम यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जमाती गटातून अभाविप आणि शिक्षणमंचच्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, खुल्या प्रवर्गातील प्रशांत दोंतुलवार व प्राचार्य देविदास चिलबुले विजयी झाले. मात्र, गोविंद सारडा, अॅड.आशिष धर्मपुरीवार, धनंजय पोरके, शंकर मगडीवार व नीलेश जाधव पराभूत झाले. अभाविप व शिक्षण मंचचे दिग्गज उमेदवार संदीप लांजेवार व गीता सुशील हिंगे यांना पराभव पत्करावा लागला.