गावात नेऊन दुरूस्त करून घेतली वीज : पदेवाही येथील नागरिक खंडीत वीज पुरवठ्याने त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : मागील दीड वर्षापासून सातत्याने होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पदेवाही येथील नागरिकांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वीज अभियंत्यांना घेराव घालून वीज दुरूस्तीसाठी गावाला नेले. एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पदेवाही गावातील नागरिकांनी खंडीत वीज पुरवठ्याच्या अनेकवेळा तक्रारी करून कायमस्वरूपी उपाय शोधण्याची मागणी केली होती. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची वीज विभागाने दखलच घेतली नाही. सोमवारी रात्री ८.३० वाजता पदेवाही येथील वीज पुरवठा खंडीत झाला. पदेवाही येथील नागरिकांनी तेव्हाच महावितरणचे कार्यालय गाठले. यावेळी अभियंता आर. बी. रोहणकर उपस्थित होते. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर त्यांनाच वीज बिघाड दुरूस्तीसाठी गावाला नेले. वीज विभागाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते. आंदोलनाचे नेतृत्व गुरूपल्लीच्या सरपंच सुनिता तलांडे, पं.स. सदस्य जनार्धन नल्लावार, प्रविण आईलवार, बालाजी आत्राम यांनी केले. वीज पुरवठा खंडीत होण्याबाबत अभियंता पोहणकर यांना विचारले असता, एटापल्ली तालुक्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. वादळ, पाऊस झाल्यानंतर एखादे झाड पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होणे ही समस्या निर्माण होते. एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडीत होते. कधीकधी कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे अनेक वीज उपकरणे निकामी झाली आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहर व ग्रामीण यामध्ये भेदभाव एटापल्ली येथील वीज कार्यालय गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दित येते. गुरूपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पदेवाही हे गाव येते. पदेवाही येथील लाईट गेल्याची तक्रार आल्यास वीज विभागाचे अभियंता एटापल्ली शहराची लाईट सुरू ठेवणे गरजेचे आहे. तुमचा खेडेगाव आहे, असे उत्तर देऊन वीज बिघाड दुरूस्त करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहर आणि खेडे असा भेदबाव केला जात असेल तर एमएसईबीचे कार्यालय आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दित आहे, असा प्रश्न पदेवाही येथील नागरिकांनी वीज विभागाच्या अभियंत्यांना आंदोलनादरम्यान केला.
विजेसाठी रात्रीच अभियंत्याला घेराव
By admin | Published: June 14, 2017 1:48 AM