लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे. यातून शेतकऱ्याने स्वत:ची तर आर्थिक उन्नती साधली. शिवाय गावातील १५ ते २० मजुरांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.रामपूर येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर खरकाटे यांनी गाढवी नदी काठावर असलेल्या स्वत:च्या चार एक शेतजमिनीवर सुरुवातीला सिंचनाची व्यवस्था करण्याकरिता नदीमध्ये मोटारपंप बसविला. शेतात विविध प्रजातींच्या आंब्याची रोपे लावली. जवळपास १५ झाडे सध्या मोठी झाली असून दरवर्षी हजारो रूपयांची उत्पादन ते देत आहेत. गेल्या १० वर्षापासून चार एकर जागेत चवळी, कोबी, वांगी, भेंटी, कारले, टमाटर, मिरची तर काही जागेत मक्का असा विविध प्रकारचा भाजीपाला व पिके शेतकरी खरकाटे घेत आहेत. शेतात भाजीपाला लागवड करणे, कोडकी करणे, भाजीपाला तोडणे या कामाकरिता नियमित १५ ते २० महिला खरकाटे यांच्याकडे कामाला असतात. त्यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळाला आहे.भाजीपाल्याच्या हंगामात दररोज तीन ते चार क्विंटल भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. शासन रोजगार देण्याकरिता कमी पडत असले तरी शेतकरी गावातील मजुरांना वर्षभर रोजगार देत आहे. शिवाय आपली आर्थिक उन्नतीही साधत आहे. खरकाटे यांची ही शेती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
भाजीपाल्यातून साधली उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:43 AM
निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे.
ठळक मुद्देरामपुरात चार एकरात लागवड : शेतकऱ्याने अनेक मजुरांनाही दिला रोजगार