उद्योगांसाठी केली जाणार सोय : खासगी कंपन्यांच्या भागीदारीतून उभारणीगडचिरोली : गडचिरोली ते सूरजागड हा लोहमार्ग करण्यासाठी सर्वेक्षण काम सुरू केले जाणार असल्याचे संकेत राज्याचे आदिवासी व विकास व वन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आगामी काळात रेल्वे मार्गाचे जाळे अधिक मजबूत होण्याची शक्यता दिसून येत आहे. वडसा-गडचिरोली हा बहुप्रलंबित रेल्वे मार्ग आता मार्गी लागला आहे. या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाकरिता वन विभागाची ६९.४ हेक्टर, शासनाची १२.६३ हेक्टर व १२५.९१ हेक्टर खासगी हमीन लागणार आहे व जमीन अधिग्रहणाचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करणार आहे. हा रेल्वे मार्ग केवळ गडचिरोलीपर्यंतच येऊन थांबणार नाही तर पुढे हा मार्ग सूरजागड येथेही नेला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे. एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर लायर्ड्स मेटल या खासगी कंपनीला सध्या उत्खननासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी येथून लोह खनिज उत्खननाचे काम सुरू केले आहे. परिसरातील १२ ते १५ गावातील ३०० वर अधिक मजुरांना येथे काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भागापर्यंत रेल्वे मार्ग आगामी तीन वर्षांच्या काळात नेला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री आत्राम यांनी दिली आहे. लवकरच गडचिरोली ते सूरजागड या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सूरजागड पहाडीवर लायड्स मेटल शिवाय आणखी दहा कंपन्यांना लीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार भागीदारीतून हा रेल्वे मार्ग पुढे नेणार आहे, अशी माहिती आहे. या रेल्वे मार्गावर कंपनीची माल वाहतूक व शासनाची प्रवासी वाहतूक चालेल, अशा पद्धतीचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागाला महत्त्व येणार आहे. त्यामुळे या उद्योगांना स्थानिकांनी विरोध करू नये, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
गडचिरोली-सूरजागड लोहमार्ग सर्वेक्षणाचे पालकमंत्र्यांचे संकेत
By admin | Published: November 04, 2016 12:18 AM