विद्युत पुरवठा खंडित : वीज बिल न भरण्याचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरातील चार ते पाच गावांचा वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गुड्डीगुडम परिसर चार दिवसांपासून अंधारात सापडला आहे. परिणामी विद्युत विभागाविरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सुरळीत वीज पुरवठा न मिळाल्यास तसेच खंडित वीज पुरवठा लवकर सुरळीत न केल्यास यापुढे वीज बिल भरणार नाही, असा निर्णय गुड्डीगुडम परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. तसा इशाराही महावितरणला दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुड्डीगुडम परिसरात वीज पुरवठा लपंडावाची समस्या भेडसावत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास लोकांच्या तक्रारीनुसार वीज कर्मचारी उशिरा येऊन वीज पुरवठा सुरळीत करतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. गुड्डीगुडम परिसरातील गावांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी जिमलगट्टा ऐवजी नंदीगाव येथून वीज जोडणी करावी, अशी मागणी गुड्डीगुडम येथील तुळशिराम ओतपाकला, तिमरम येथील श्रीनिवास पाकावार, नारायण कोतकोंडावार, वामन भोयर, तिरूपती भोयर, शिवराम कोरेत, निमलगुडमचे राकेश बावनकर, शिवनाथ कोडापे, दिलीप मेश्राम, राकेश सोयाम, तिमरमचे सरपंच महेश मडावी, देवाजी सडमेक, सतीश पेंदाम यांच्यासह गुड्डीगुडम, तिमरम, निमलगुड्डम आदी गावातील नागरिकांनी केली आहे. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुड्डीगुडम परिसर चार दिवसांपासून अंधारात
By admin | Published: June 11, 2017 1:31 AM