लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील दामरंचा येथे किसान गोष्टी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दुबार पीक कसे घ्यावे, या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.दामरंचा परिसरात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर त्याच शेतात पुन्हा हरभरा, लाखोळी, जवस, उडीद, मुग, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही पिके घेण्यासाठी फारशी मशागत करावी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होते. शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड आधुनिक पध्दतीने करावी. तसेच त्याला सेंद्रीय शेतीची जोड द्यावी, या उद्देशाने दामरंचा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना हरभरा व इतर रबी पिकांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गर्शन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. तसेच बियाणे कसे वापरावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांची अवजारे बँक गावात स्थापन करण्यात आली. या बँकेमुळे गरजू शेतकऱ्याला वेळेवर अवजारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडळ कृषी अधिकारी संदेश खरात, बीटीएम अमोल दहागावकर, कृषी सेविका पल्लवी आतला, कृषी मित्र गोमोस, पंचशील महामंडळ बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये शेतीविषयक जनजागृती निर्माण होऊन दरएकरी उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
किसान गोष्टी कार्यक्रमातून दुबार पिकाविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 10:25 PM