गडचिराेली : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त तालुक्यातील हिरापूर येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ गुद्देवार, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने उपस्थित हाेते. उपविभागीय कृषी अधिकारी कदम यांनी बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी, बीज प्रक्रिया कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने यांनी धानपिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. संचालन कृषी सहायक नितीन मुद्दमवार, प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी चेतन चलकलवार यांनी केले. १ ते ७ जून या कालावधीत तालुक्यातील सर्व गावांमधील कृषी सप्ताह साजरा केला जाणार आहे. हिरापूर, मेंढा, डाेंगरगाव, मारदा, बेनाेली, साखरा, नगरी येथेही शेतकऱ्यांच्या सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.