लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी व मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोरडवाहू क्षेत्र विकासाचे मॉडेल जिल्हास्तरीय कृषी व गोंडवन महोत्सवात ठेवण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये कोरडवाहू शेतीमध्ये कोणते उत्पादन घ्यावे, ते कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विविध प्रतिकृती फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सदर मॉडेल शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण शेती क्षेत्राच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी या जमिनीत उत्पादन घेत नाही. त्यामुळे सदर जमीन पडीक राहते. जमीन असूनसुद्धा शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नसल्याने हलाखीचे जीवन जगावे लागते. कोरडवाहू क्षेत्रातही विविध पिके घेता येतात. ही बाब शेतकऱ्यांना माहित झाल्यास शेतकरी कोरडवाहू जमिनीत पिके घेण्यास तयार होतील, या उद्देशाने चामोर्शी व मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या अधिकारी व कृषी सहायकांनी कोरडवाहू क्षेत्र विकासाचे मॉडेल तयार केले.या मॉडेलमध्ये एकात्मिक शेती पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोरडवाहू जमिनीत फळझाडे लावण्यास शेतकऱ्यांना बहुवार्षिक उत्पादन मिळण्यास मदत होईल. बांबू, साग, निलगिरी, सुबाभूळ यासारखी झाडे लावल्यास शेतकऱ्यांना अनेक वर्ष उत्पादन मिळेल. दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन आदी व्यवसायसुद्धा करता येतील. सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यात अधिक शेती करता येईल. पॅक हाऊस तयार केल्यास भाजीपाल्यासारखे उत्पादन काही दिवस साठवून ठेवता येईल. त्यामुळे शेतकºयांना योग्य मोबदला मिळेल. शेडनेट शेती व पॉलीहाऊस निर्मिती केल्यास कोणत्याही ऋतुत उत्पादन घेता येईल.गडचिरोली जिल्ह्यात मधुमक्षिका पालन हा चांगला व्यवसाय ठरू शकतो. आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, १३ कोटी वृक्ष लागवडीची माहिती देण्यात आली आहे. या सर्व बाबी शेतकऱ्यांना पटतील, या स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मॉडेलला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर मॉडेलच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. विशेष आकर्षण व ज्ञानवर्धक बाब असल्याने काही शेतकरी स्वत:हून अधिकची माहिती जाणून घेत आहेत.सदर मॉडेल उभारण्याकरिता तालुका कृषी अधिकारी राजपूत, कृषी सहायक विजय पत्रे, किशोर भैसारे, मनोहर दुधबावरे, उत्तम खंडारे, परसवार, मुंडे, तलाशकुमार गेडाम, पेंदाम, विनोद होडबे, विलास खोब्रागडे, एच. वाय. वाघमारे, धोटे यांनी सहकार्य केले.कृषी योजनांची माहितीकोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने स्वतंत्र कार्यक्रम यावर्षीपासून सुरू केला आहे. या अंतर्गत शासन विविध योजना राबवित आहे. काही योजनांमध्ये शासनातर्फे शेतकºयांना अनुदानसुद्धा दिले जाते. या योजनांची माहिती मॉडेलमध्ये देण्यात आली आहे.मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे सुद्धा शासनाच्या वतीने दिले जात आहेत. कोरडवाहू क्षेत्राच्या विकासात शेततळ्यांचे विशेष महत्त्व असल्याने शेततळ्यांच्या योजनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. दुधाळ जनावर खरेदीच्या योजनेची माहिती समाविष्ट आहे.
कोरडवाहू मॉडेल ठरले मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:31 AM
चामोर्शी व मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोरडवाहू क्षेत्र विकासाचे मॉडेल जिल्हास्तरीय कृषी व गोंडवन महोत्सवात ठेवण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये कोरडवाहू शेतीमध्ये कोणते उत्पादन घ्यावे, ते कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करणाºया विविध प्रतिकृती फलक लावण्यात आले आहेत.
ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी लाभदायक : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात ठरले विशेष आकर्षण