दूरध्वनीसेवा ठप्प : बॅटर्या नादुरूस्त; डिझेलही नाही
गडचिरोली : महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा करण्यासाठी असलेले जनरेटरही डिझेलअभावी बंद असल्याने वीज पुरवठा खंडीत होताच ग्रामीण भागातील कव्हरेजही गुल होत आहे. मोबाईल हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे व्यक्ती तेवढे मोबाईल सध्या दिसून येतात. शहरी भागासह ग्रामीण भागातही मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जेवढे जास्त मोबाईलधारक तेवढा जास्त नफा हे सरळ आर्थिक समीकरण असल्याने मोबाईल कंपन्या आपला विस्तार ग्रामीण भागातही करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) चे एकूण ८८ मोबाईल टॉवर आहेत. मोबाईल टॉवर वीज वितरण कंपनीकडून मिळणार्या विजेवर चालतात. एकूण ८८ टॉवरपैकी ५० पेक्षा अधिक टॉवर दुर्गम भागामध्ये आहेत. विद्युत लाईन जंगलामधूनच गेली असल्याने सोसाट्याचा वारा होताच एखादे झाड पडून विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना नेहमी घडतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतरही टॉवरला विजेचा पुरवठा होत राहावा. यासाठी प्रत्येक टॉवरला बॅटरीज बसविण्यात आल्या आहेत. मात्र ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही बहुतांश टॉवरमधील बॅटरीज बदलविण्यात आल्या नाहीत. यातील काही बॅटरीज नादुरूस्त आहेत तर काहींची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या बॅटरीज व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसून येते. महावितरणसारखी लेटलतीफ कंपनी अख्ख्या राज्यात शोधुन सापडणार नाही. विशेषकरून गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर किमान दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. या नेहमीच्या बाबी झाल्या आहेत.या कालावधीत टॉवरला बॅटरीने वीज पुरवठा होऊन टॉवर सुरू राहावा, अशी अपेक्षा नागरिक करीत असला तरी बॅटरीज पुर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने टॉवरला जास्तीत जास्त २ ते ३ तास विद्युत पुरवठा होऊन टॉवर सुरू राहतो. त्यानंतर बॅटरींची कार्यक्षमता पूर्णपणे संपत असल्याने टॉवरला विजेचा पुरवठा होत नाही. परिणामी त्या परिसरातील कव्हरेज काही वेळातच गायब होतो. बॅटरीज काम करणे बंद झाल्यानंतरही शेवटचा पर्याय म्हणून बहुतांश टॉवरच्या ठिकाणी बीएसएनएलतर्फे जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील काही ठिकाणचे जनरेटरही नादुरूस्त आहेत. तर काही ठिकाणी डिझेलच उपलब्ध राहत नाही. परिणामी शेवटचा पर्याय असलेला जनरेटरसुध्दा सुरू होत नाही. त्यामुळे मोबाईल टॉवर काम करणे बंद होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. घरी असलेली विजेवर चालणारी सर्व मनोरंजनाची व इतर साधने बंद होतात. त्यामुळे नागरिक गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच अगदी काही वेळातच मोबाईलचा क व्हरेजही गायब होतो. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ अधिकच उडतो. वीज व मोबाईल या दोन बाबी जेवणापेक्षाही महत्वाच्या ठरत चालल्या आहेत. या दोन्ही बाबी गावात उपलब्ध नसल्यानंतर त्या गाववासियांना जणू ते अंदमान किंवा निकोबारच्या बेटावर किंवा एखाद्या घनदाट जंगलामध्ये राहात असल्याचा भास होतो. रात्र काढणे कठीण होऊन बसते. बीएसएनएलने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन बॅटरीज तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)