मनोज ताजने
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डासापासून उद्रेक होणाऱ्या हिवताप, अर्थात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण राज्यात गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ५० टक्के रुग्ण या एकाच जिल्ह्याचे असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर हिवताप नियंत्रणाच्या तयारीसाठी वैद्यकीय यंत्रणेला मोठी कसरत करावी लागते. गेल्यावर्षी म्हणजे २०२० मध्ये राज्यात हिवतापाचे १२९१७ रुग्ण आढळले होते. त्यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील ६४८५ रुग्ण होते. त्यापैकी या जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यूही झाला. २०१५ पासूनच्या आकड्यांवर नजर टाकल्यास हे प्रमाण थोड्याफार फरकाने असेच आहे. यावर्षी (२०२१) डासांसाठी पोषक काळ नसतानाही जानेवारी ते मे या काळात १२४४ हिवतापाचे रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी ७६ टक्के भागावर जंगल आहे. जंगलामुळे डासांचे प्रमाण जास्त असले तरी ग्रामीण भागातील आदिवासी लोक रात्रीच्या वेळी घराबाहेरच झोपतात. विशेष म्हणजे हिवताप नियंत्रण विभागाकडून दर तीन वर्षांनी त्यांना मोफत मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते. पण त्याचा वापर रात्री झोपण्यासाठी करण्याऐवजी मासे पकडण्यासाठी केला जातो.
जून ते डिसेंबरचा काळ धोक्याचा
हिवतापाच्या डासांची उत्पत्ती पाण्याच्या डबक्यात होते. त्यामुळे हिवतापाचा उद्रेक होण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ सर्वाधिक धोकादायक समजला जातो. मादी डास एकावेळी २५० ते अंडी देते. महिन्यातून ४ वेळा ती अशा पद्धतीने अंडी देते. हा डास ३ ते ४ किलोमीटर परिसरात उडतो. गडचिरोली जिल्ह्यात या डासांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे हिवतापाचे प्रमाण जास्त असल्याचे अधिकारी सांगतात.