लिकेश अंबादे
गडचिरोली : छत्तीसगड या राज्याला जोडणारा सीमेलगतचा काेरची तालुका आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील छत्तीसगडी नागरिकांचे वास्तव्य तालुक्यात अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बासी या खाद्यपदार्थाचे सेवन करतात. तेच कोरची तालुक्यात शेकडो वर्षांपासून बासीचे सेवन करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी छत्तीसगड राज्यातील बहुतांश नागरिक आवडीने बासी या अन्नाचे सेवन करतात. कोरची तालुका सीमेलगत असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिक सुद्धा बासीचे सेवन करीत आहेत.
बासी म्हणजे काय?
बासी म्हणजे रात्र जेवणानंतर जे शिळा भात उरलेला असते किंवा बासी बनविण्यासाठी जास्तीच बनविलेला भात असतो. त्यात भात शिजविताना जे जास्तीचे पाणी आपण बाहेर काढतो ते साधे पाणी घालून व थोडे मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवलेले खाद्य असते. ते म्हणजे बासी होय. ज्याचे सेवन खास करून उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तसेच सारखी तहान लागू नये याकरिता व सकाळचे जेवणाचे खर्च व त्रास वाचविण्यासाठी केल्या जाते.
बासी खाण्याचे फायदे ...
बासीमुळे जी भूक असते तीही मिटते आणि दुसरे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात ४० डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वर पारा चढतो तेव्हा नागरिकांना पाण्याची तहान व थंड पाण्याची सारखी गरज भासते. अशावेळी बासी पाणी पिल्याने ते मिटते, तसेच तहान भागविण्याचे व शरीराला थंड ठेवण्याचे कामही करते.
बासी सेवन करण्याची पद्धत
बासी सोबत आपण आंब्याच्या ठेचा, लोणचं सुद्धा खाऊ शकतो किंवा बासी सोबत आपण हिरवी भाजी खाऊ शकतो. ती खाण्यासाठी अतिशय चविष्ट व पोषक असते. उन्हाळ्याच्या दिवसात श्रीमंत लोक शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी, कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत, उसाचा रस, आमरस अशा विविध खर्चिक शीतपेयांचे सेवन करतात. याउलट गरीब नागरिक, शेतमजूर, आदिवासी रोजगार हातावर पोट भरणारे लाेक दोन पैशांची बचत करण्यासाठी रात्रीच्या जेवणात अधिकचे अन्न शिजवून त्या अन्नाचे बासीत रूपांतर करून बासी या अन्नाचे सेवन करतात.
होळीचा सण करून बासी खाण्यास सुरुवात करतो कारण उन्हाचा पारा होळी सणापासून चढायला सुरुवात होते. बासी शरीराला थंडावा देते, वारंवार तहान लागत नाही. शरीराला ऊर्जा देते. भात, भाजी-पोळी खाल्यास उन्हाळी लागते. खूप गर्मी जाणवते.
- जोहारी मिलवू घुगवा, वाॅर्ड नंबर ०४, कोरची.