लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे अतिक्रमित दुकाने हटविली जात आहेत. याच भरवशावर प्रपंच करणाऱ्या शेकडो अतिक्रमणधारक बेरोजगार होण्याचे संकट कोसळले आहे.मार्गाच्या बाजुला ठेले, हातगाड्या व टिनाचे शेड उभारून शेकडो बेरोजगार तरूण नागरिकांना सेवा देण्याबरोबरच स्वत:च्या संसाराचा गाडा हाकत होते. कमी किमतीत चांगली सेवा व वस्तू देत असल्याने चांगल्या दुकानापेक्षाही फुटपाथवरील दुकानांमध्ये गर्दी दिसून येत होती. काही अतिक्रमीत हॉटेल चालकांनी येथील प्रसिध्द हॉटेललाही मागे टाकत ग्राहक खेचले होते. बुधवारपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला बसस्थानकानजीक सुरूवात झाली आहे. सर्वप्रथम ड्रेनेजचे काम केले जात आहे. यासाठी पाच फूट रूंद व पाच फूट खोलीचे खोदकाम केले जात आहे. हे काम इंदिरा गांधी चौकाकडे आणले जात आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले. अतिक्रमण हटविले नाही तर संबंधित दुकानाचे साहित्य जप्त केले जातील, असा इशारा दिला होता. कधीना कधी अतिक्रमण हटणारच आहे. ही बाब लक्षात घेऊन दुकानदारांनी स्वत:च पुढाकार घेऊन अतिक्रमण काढले. महामार्गाचे काम पुन्हा एक ते दोन वर्ष चालणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी व्यवसाय सुरू करणे अशक्य होणार आहे. फूटपाथ व ड्रेनेजवर खांब उभारले जाणार असल्याने भविष्यातही या ठिकाणी पक्के अतिक्रमण अशक्य होणार आहे.
मार्गासाठी अतिक्रमणावर हतोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:54 PM
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे अतिक्रमित दुकाने हटविली जात आहेत. याच भरवशावर प्रपंच करणाऱ्या शेकडो अतिक्रमणधारक बेरोजगार होण्याचे संकट कोसळले आहे.
ठळक मुद्देमहामार्गाचे काम सुरू : फुटपाथवरील शेकडो दुकानदार बेरोजगार