लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असले तरी चामोर्शी तालुक्यातील हातभट्टी चालकांचा दारू गाळण्याचा व्यवसाय जोमात सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने अलिकडे केलेल्या कारवायांवरून स्पष्ट झाले. गेल्या आठवड्यात काही हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा एकदा लालडोंगरी परिसरातील लांडोबा नाल्याजवळ कारवाई करून जवळपास ५ लाख रुपये किमतीचा सडवा व दारू जप्त करण्यात आली.पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय आणि जुगारावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. ठोक दारू विक्रेता अविनाश आनंद सरकार हा दारू गाळून पुरवठा करीत असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर पथकाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी लालडोंगरी परिसरातील लांडोबा नाल्याजवळ धडक दिली. यावेळी तिथे दोन इसम संशयित स्थितीत दिसले. त्यांना आवाज दिला असता ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यातील एक जण अविनाश सरकार तर दुसरा अनोळखी असल्याचे स्थानिक पंचांनी सांगितले. यानंतर तिथे तपासणी केली असता १८ प्लास्टिक ड्रममध्ये भरून असलेला ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मोह सडवा, ८ लहान ड्रममध्ये भरून असलेला ८० हजार रुपयांचा मोह सडवा तसेच ५ प्लास्टिक ड्रममध्ये भरून असलेली २५० लिटर हातभट्टीची दारू (किंमत ५० हजार) असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई सहायक उपनिरीक्षक दादाजी करकाडे, पुष्पा कन्नाके, सुनील पुट्ठावार, मंगेश राऊत, सिद्धेश्वर बाबर, ईश्वर पेंदाम आदींनी केली.
चामोर्शी तालुक्यात लॉकडाऊनमध्ये हातभट्टीचालकांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 5:00 AM
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय आणि जुगारावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. ठोक दारू विक्रेता अविनाश आनंद सरकार हा दारू गाळून पुरवठा करीत असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर पथकाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी लालडोंगरी परिसरातील लांडोबा नाल्याजवळ धडक दिली.
ठळक मुद्देपाच लाखांचा सडवा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई