पत्रकार परिषद : शहीद कुटुंबीयांची मागणी गडचिरोली : नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी अटक केलेल्या दिल्ली विद्यापीठाचे प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींना मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच विजय तिरकी यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रा. साईबाबा हा नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असल्याने देशातील कोणत्याही न्यायालयाने त्याला जामीन देऊ नये, न्यायालयाने प्रा. साईबाबा याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील शहीद कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पत्रकार परिषदेला शहीद कुटुंबातील वेणूताई बंडावार, अनीता झरकर, अनीता शेट्टीवार, हर्षा धुळसे, छबीना दुर्गे, अल्का रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी हेमलता वाघाडे म्हणाल्या, नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असलेल्या प्रा. साईबाबा यांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ फोफावली. आतापर्यंत ४७४ सामान्य नागरिकांचा नक्षल्यांनी बळी घेतला असून ३१२ निरपराध लोकांना जखमी केले. १९१ पोलीस जवान शहीद झाले. १० कोटी रूपयांची सरकारी मालमत्तेचे नुकसान नक्षल्यांनी केले. नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला आहे. ४ एप्रिल २०१६ रोजी न्यायालयाने प्रा. साईबाबा याला जामीन मंजूर केला नसता तर हिंसक घटना घडल्या नसत्या, असेही त्या म्हणाल्या. प्रा. साईबाबा याचे कृत्य देशद्रोहाचे आहे. त्याला पुन्हा जामीन मिळण्यासाठी त्याचे कुटुंबीय तसेच इतर कोणत्याही व्यक्तींनी प्रयत्न करू नये, साईबाबाला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शहीद कुटुंबीयांनी केली. प्राध्यापकाच्या पेशावर साईबाबा कलंक आहे, त्याने चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी घडविले असावेत, असे ते म्हणाले.
आरोपी साईबाबाला फाशी द्या
By admin | Published: March 11, 2017 1:36 AM