दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक धान लागवड पद्धतीपेक्षा सगुणा पीक लागवड पद्धतीत कमी खर्च येत असून उत्पादन अधिक मिळत असल्याने या धान लागवड पद्धतीकडे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सगुणा पद्धतीने धान लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीच्या पुढाकाराने यंदा २०१८-१९ वर्षातील खरीप हंगामात एकूण ४५७ एकर क्षेत्रात सगुणा पद्धतीने धान पिकाची लागवड होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात या पिकाचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी रब्बी हंगामात उन्हाळी धानपीक घेतात. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. कृषी विभाग, आत्मा कार्यालयाच्या मार्गदर्शनातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला व पुरूष शेतकऱ्यांमध्ये सगुणा पीक लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत गावागावात जनजागृती करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर व मोठ्या गावांमध्ये प्रशिक्षण घेऊन सगुणा पीक लागवडीची सविस्तर माहिती देण्यात आली. माविमच्या वतीने बचतगटाच्या महिलांची सभा घेऊन त्यांना सगुणा पीक लागवड तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. त्यामुळे बचत गटात सहभागी असलेल्या अनेक महिला शेतकऱ्यांनी सगुणा पीक लागवड पद्धतीने यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.माविमच्या वतीने नऊ तालुक्यातील २५ गावांमध्ये बैठका घेऊन सगुणा पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात आली. २५ गावातील ३२७ एकर क्षेत्रात सगुणा पद्धतीने धानाची लागवड होणार आहे. यासाठी तेथील महिलांनी तयारीही केली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात १५ गावांमध्ये सगुणा पीक लागवड करण्यासाठीच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. सदर १५ गावातील १३० एकर क्षेत्रात यंदा सगुणा पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात येणार आहे. सन २०१६-१७ मध्ये १०२ एकर तर २०१७-१८ च्या खरीप हंगामात १७८ एकर अशा एकूण २८० एकर क्षेत्रात सगुणा पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. सदर धान लागवड पद्धतीत १ हजार ७८४ शेतकºयांनी सहभाग नोंदविला होता. २८० एकरातील पीक उत्पादनाची आकडेवारी घेतली असता, धानाच्या उत्पादनात प्रतीएकर १५ टक्के वाढ झाल्याचे माविमने तयार केलेल्या अहवालात दिसून आले. तसेच धान लागवडीसाठी खर्चात ४० टक्के रक्कमेची बचत झाली. कृषी विभाग, माविम, आदिवासी प्रकल्प कार्यालय व आत्माच्या संयुक्त विद्यमाने सगुणा पीक लागवडीबाबत जिल्हा, तालुकास्तर तसेच मोठ्या गावांमध्ये कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली होती.हे आहेत सगुणा तंत्रज्ञानाचे फायदेया पद्धतीत चिखलणी व रोवणी करावी लागत नसल्याने ५० ते ६० टक्के खर्च कमी येतो. जमिनीची सुपिकता वाढते. एसआरटी गादी वाफ्यावरील रोपांची पाने जास्त रूंद व सरळ सूर्यप्रकाशाकडे झालेले दिसतात. धानाचे उत्पादन जास्त होते. रासायनिक खताच्या वापराचे प्रमाण निम्म्यावर येते. शेतजमिनीत गांडूळाची संख्या वाढते. पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. या पद्धतीमुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीने धानपिकाची रोवणी करण्याकरिता मजुरांच्या मजुरीवर बराच खर्च होतो. मात्र येथे मजूर कमी लागत असल्याचे खर्च कमी होतो.चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातही पोहोचले तंत्रज्ञानमाविम, कृषी विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्याने सगुणा पद्धतीने धानपिकाच्या लागवडीचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात वाढले आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काही शेतकरी माविमच्या संपर्कातून गडचिरोली जिल्ह्यात आले. त्यांनी प्रत्यक्ष सगुणा पद्धतीच्या धान लागवडीची पाहणी केली. तसेच या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर गतवर्षीच्या खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली, सिंदेवाही, ब्रह्म्पुरी तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सगुणा पद्धतीने धान लागवड केली.
४५७ एकरात सगुणा पद्धतीने धान लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:59 PM
पारंपरिक धान लागवड पद्धतीपेक्षा सगुणा पीक लागवड पद्धतीत कमी खर्च येत असून उत्पादन अधिक मिळत असल्याने या धान लागवड पद्धतीकडे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संख्येने वळू लागले आहेत.
ठळक मुद्देयंदाच्या खरीप हंगामातील नियोजन : महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पुढाकार