गडचिराेली तालुक्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. विविध कामानिमित्त शेतकरी शेतात ये-जा करीत असतात. सध्या उडीद, मूग, जवस, लाखाेळी, मसूर यासह अन्य कडधान्य पीक काढणीचे काम सुरू आहे. बहुतांश गावांतील शेतीही जंगलाला लागून असल्याने, तेथे अगदी सकाळी व सायंकाळी ये-जा करणे धाेक्याचे असते. त्यामुळे शेतकरी सकाळी ११ वाजतानंतरच शेतात जातात व दुपारी ४ वाजतापर्यंत घरी परत येतात. एरवी सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगतचा शेतशिवार नकाेसा झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत राजगाटा, इंदिरानगर, गाेगाव, धुंडेशिवणी येथील दाेन पुरुष व दाेन महिलांचा वाघाने बळी घेतला आहे, तर दिभनातील पुरुष व कळमटाेला चक येथील एका महिलेवर वाघाने हल्ला केला हाेता. मात्र, सुदैवाने यातून ते बचावले.
बाॅक्स
या भागात आहे वाघांचा वावर
गडचिराेली तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यात वाघाचा वावर आहे. मुडझा, वाकडी, चांदाळा, पाेटेगाव, दिभना, जेप्रा, राजगाटा, आंबेशिवणी, कळमटाेला, पिपरटाेला, कुऱ्हाडी, महादवाडी, चुरचुरा, नवरगाव, पाेर्ला, कुरंझा, टेंभा, चांभार्डा, गिलगाव, माैशिचक बाेथेडा आदी गाव परिसरात वाघाचे दर्शन नेहमीच नागरिकांना हाेत असते. या भागात वाघाचा वावर आहे. याशिवाय चांभार्डा, टेंभा, खरपी, येवली, शिवणी, दिभना आदी गाव परिसरात बिबट्यानेही काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला हाेता.