गडचिराेली शहरात जवळपास ३० हाॅटेल आहेत. यामध्ये जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थेट संबंध ग्राहकांशी येत असल्याने या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी १५ ऑगस्ट राेजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत ‘लाेकमत’ने शहरातील प्रमुख पाच हाॅटेलमध्ये रिॲलिटी चेक केले असता या हाॅटेलमधील निम्म्याच कर्मचाऱ्यांनी काेराेनाची पहिली लस घेतली असल्याचे दिसून आले आहे. त्यातही दाेन्ही लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम २० टक्केच आढळून आली.
बाॅक्स
रस्त्यावरच्या टपऱ्यांवर आनंदीआनंद
-गडचिराेली शहरात रस्त्याच्या बाजूला ठेला टाकून ६० पेक्षा अधिक व्यावसायिक उपाहारगृहे, चहाची दुकाने चालवितात. यातील १० दुकानांचा रिॲलिटी चेक केला असता यातील केवळ सात मालकांनी लस घेतली असल्याचे सांगितले.
- काही जणांनी तर लस घेतल्यास ताप येत असल्याने व्यवयाय बुडतो असे सांगितले, तर काही जणांनी लसची भीती वाटत असल्याचे सांगितले. लस कधी घेणार असा प्रश्न उपस्थित केला असता, वेळ येईल तेव्हा घेऊ, असे बेजबाबदारीचे उत्तर दिले आहे.
बाॅक्स
प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे सक्तीचे करा
ज्याप्रमाणे प्रत्येक हाॅटेलकडे अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र राहते व हे प्रमाणपत्र लॅमिनेशन करून हाॅटेलमध्ये ठेवले जाते तसेच प्रत्येक टपरी चालकाच्या मालकाचे लसीकरणाचे प्रमाणपत्र लॅमिनेशन करून दर्शनी भागावर लावणे त्याला सक्तीचे करावे. यामुळे हाॅटेल मालकाने लस घेतली की नाही ते कळून येईल. तसेच या प्रमाणपत्रापासून इतरांनाही लस घेण्यास प्रेरणा मिळेल.
बाॅक्स
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी
गडचिराेली शहरातील मुख्य पाच हाॅटेलची ‘लाेकमत’ने पाहणी केली असता त्यात काही कर्मचाऱ्यांनी पहिला डाेस घेतला असल्याची माहिती दिली. दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या अतिशय अल्प असल्याचे आढळून आले आहे.
काेट
जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अजूनही लस घेतली नाही, त्यांना लस घेण्याबाबत हाॅटेल मालकाने सूचना कराव्यात, असे हाॅटेल मालकांना कळविण्यात आले आहे. लवकरच सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाेईल अशी अपेक्षा आहे.
-चंद्रकांत पतरंगे, अध्यक्ष, हाॅटेल असाेसिएशन गडचिराेली