गडचिरोली : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यात भारतीय खाद्य संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रात चटणीसाठी लाल मुंग्यांना मोठी पसंती आहे. या मोसमात लाल मुंग्यांची चटणी बनविली जाते. सध्या या चटणीची चांगलीच चर्चा सुरू आहे.
भामरागड तालुक्याच्या घनदाट जंगलात या मुंग्या आढळतात, मुंग्या आणि मुंग्यांची अंडी त्यांच्या पोळ्यातून गोळा करून स्वच्छ केली जातात. त्यानंतर ते बारीक करून वाळवतात. नंतर त्यात लसून, आले, मिरची आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून वाटून घेतात. भामरागड तालुक्यातील आदिवासी लोकांसाठी ही लाल रंगाची मुंग्यांची चटणी अतिशय प्रिय आहे. मात्र, आता या परिसरात येणाऱ्या पर्यटकांनादेखील ही चटणी आवडू लागली आहे. चटणीत भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे जुने जाणकार सांगत असल्याने भामरागड तालुक्याच्या लाहेरी परिसरातील नागरिक लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात. एक महिला लाल मुंग्या वाळवून त्यांची सफाई करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे.