देसाईगंज : जिल्ह्यातील प्रगत तालुका म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्यात दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकाच दिवशी तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे.
तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नगर प्रशासन, पोलिस विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. याचा गैरफायदा घेत नागरिक सैराट झाले आहेत.
कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांत तालुक्यातील विसोरा येथील एक, विरशी वार्डातील दोन, सीआरपीएफ कॅम्प येथील चार, भगतसिंग वार्डातील एक, कोकडी येथील एक, गांधी वार्डातील दोन, महात्मा गांधी विद्यालयातील तीन, आंबेडकर वार्डातील एका रुग्णाचा समावेश आहे.
नागरिकांच्या बेलगाम वागण्याला वेळीच लगाम लावण्यासाठी विनामास्क फिरणारे, दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अनावश्यक गर्दी करून कोविडच्या नियमांना हरताळ फासणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नियमांची ऐसीतैसी करत गावागावात विनापरवाना लग्न सोहळे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या गर्दीत पार पाडल्या जात आहेत. देसाईगंजच्या मुख्य बाजारपेठेतील काही दुकानात कोविड-१९ चे नियम चक्क धाब्यावर बसवून अनावश्यक गर्दी करण्यात येत आहे. या माध्यमातूनही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.