प्राप्त माहितीनुसार गेल्या एक ते दीड वर्षातील लाॅकडाऊनच्या काळात फायनान्स कंपनीचे एजंट म्हणून काम करणाऱ्या काही लाेकांनी ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन दुचाकी वाहन १० ते १५ हजार रुपयांची सूट देऊन मिळवून देण्याचे आमिष नागरिकांना दाखविले. त्यासाठी दुचाकीची किमत राेख स्वरूपात भरावी लागेल, अशी अट टाकली. लाॅकडाऊनमुळे बस आणि इतर प्रवासी वाहने बंद असल्यामुळे नागरिकांना स्वत:च्या वाहनाची गरज निर्माण झाली. त्यातच १० ते १२ हजार रुपये कमी किमतीने वाहन मिळत असल्याचे पाहून अनेकजण त्या आमिषाला बळी पडले. अनेकांनी इकडून-तिकडून पैशाची जुळवाजुळव करत प्रतिवाहन ६० ते ६२ हजार रुपये ‘त्या’ एजंटकडे माेठ्या विश्वासाने दिले. एवढेच नाही तर पैसे देणाऱ्यांना नवीन दुचाकी वाहनही मिळाले. पण हे वाहन आपण भरलेल्या पैशातून नाही तर आपल्या नावावर काढलेल्या कर्जातून दिल्या गेल्याचे कळताच स्वस्तात वाहन मिळाल्याच्या आनंदात असणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
बाॅक्स..
फायनान्स कंपन्यांचाही हात
कमी किमतीत दुचाकी वाहन मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांनी संबंधितांकडून राेख रकमेसाेबत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड तसेच इतर काही आवश्यक कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्याकडून काही अर्जांवर सह्या घेतल्या. त्या आधारे काही फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी वाहनासाठी त्यांच्या नावावर कर्ज उचलले. परंतु त्याची वाहनधारकांना कल्पनाच नव्हती. आपण दुचाकीचे पैसे राेख स्वरूपात भरले आहेत, अशीच त्यांची धारणा हाेती. परंतु प्रत्यक्षात ते पैसे एजंटच्या रूपात आलेल्या भामट्यांनी लाटून पाेबारा केला. अशा पद्धतीने कर्जदाराला समाेरासमोर उभे न करता परस्पर कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांतील व्यक्तींचाही या फसवणुकीत हात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
बाॅक्स .......
इतर जिल्ह्यातही फसवणूक
कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे लाेक दारी आल्यानंतर वाहनधारकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधित एजंटचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला; पण काेणीही सापडले नाही. त्यामुळे चार दिवसांपूर्वी कुरखेडा आणि गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये काही लाेकांनी धाव घेत तक्रार दाखल केली. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांचे जाळे लगतच्या चंद्रपूर आणि इतर काही जिल्ह्यांत पसरले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काेट .....
या प्रकरणाची वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चाैकशी सुरू असून, लवकरच गुन्हा दाखल करत आहाेत. प्रकरणाची व्याप्ती माेठी आहे. त्यामुळे सबळ पुरावे गाेळा केले जात आहेत.
- प्रमाेद बानबले, पाेलीस निरीक्षक, गडचिराेली पाेलीस स्टेशन