लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पश्चिमेकडील देशांच्या संस्कृतीत मुले मोठी झाली की, आई-वडिलांनाही दूर करून स्वच्छंदी जीवन जगतात, असा समज आहे. पण हा समज खोटा ठरवत तब्बल १५६ वर्षांपूर्वी आपल्या पणजोबांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी वयाची ८० पार केलेल्या पणतूंनी आॅस्ट्रेलियावरून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गाठले आणि पणजोबांच्या आठवणींना उजाळा दिला.गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व-दक्षिण सीमेवरील सिरोंचा व छत्तीसगड जिल्ह्यातील बस्तर ही ब्रिटिश काळात महत्वाची शहरे होती. या क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून १८५२ ते १८६२ या काळात चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्या काळात त्यांनी तिथे बरीच विकासात्मक कामेही केली होती. त्यामुळेच त्यांची आठवण म्हणून सिरोंचा तालुक्यात ‘ग्लासफोर्डपेठा’ या नावाचे एक गाव आजही कार्यरत आहे.डायरीतील पणजोबांच्या माहितीवरून त्यांचे पणतू फिटर ग्लासफोर्ड (८७), सुजन ग्लासफोर्ड (८३) आणि जेनिफर हनमोल्ड (७७) यांनी बुधवारी बामणी जवळील ग्लासफोर्डपेठा या गावाला सकाळी भेट देऊन गावातील स्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला भेट देऊन अर्धा तास चर्चा केली.या चर्चेदरम्यान रवी सल्लमवार, नागपूर येथून त्यांच्यासोबत आलेले गाईड हिमांशू, ग्लासफर्डपेठा येथील देवाजी मेडी, माजी उपसरपंच वेंकटस्वामी कारसपल्ली आदी उपस्थित होते.चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड हे आपल्या वयाच्या १८ व्या साली सिरोंचात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्लासफोर्ड यांनी स्वत: २० डायºया लिहिल्या असून एका पुस्तकात त्यांनी ग्लासफोर्डपेठा, सिरोंचा व बस्तरबाबत माहिती लिहून ठेवली आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही आस्ट्रेलियावरून सिरोंचाला आल्याचे त्यांनी गाईडला सांगितले.
पणजोबांच्या आठवणीत आॅस्ट्रेलियावरून गाठले गडचिरोलीतील सिरोंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 3:49 PM
तब्बल १५६ वर्षांपूर्वी आपल्या पणजोबांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी वयाची ८० पार केलेल्या पणतूंनी आॅस्ट्रेलियावरून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गाठले आणि पणजोबांच्या आठवणींना उजाळा दिला.
ठळक मुद्देब्रिटिशकालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पणतूंची भेट १५६ वर्षांपूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सेवा