सुधीर फरकाडेगडचिराेली : निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही असे म्हटले जाते. रुद्रावतार धारण करून कधी निसर्ग काळ बनून समोर उभा ठाकेल याचा नेम नसतो. पण अशा स्थितीतही कोणी परमेश्वरासारखे मदतीला धावून त्या संकटातून सुखरूप बाहेर काढते. याचा प्रत्यय बुधवारी चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे आला.
गावाच्या परिसरातील शेळीपालन करणाऱ्यांच्या जवळपास दोन हजार शेळ्या घेऊन गणपूर येथील शेळकी (मेंढपाळ) बंडू कोहपरे, अमोल येकलवार, राकेश कोहपरे व दिलीप चौधरी हे वैनगंगा नदीपात्राच्या परिसरात चारायला गेले होते. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच उपनद्यांची पाणी पातळी वाढली असल्याने ते पाणी वैनगंगा नदीपात्रात येऊन वैनगंगा नदीची पाणी पातळी अचानक वाढली. अचानक आलेले हे संकट पाहून चारही शेळक्यांची भंबेरी उडाली.
दोन हजार शेळ्यांचा कळप नदीपलीकडे अडकून पडला. पूर उतरेपर्यंत शेळ्यांना घेऊन तिकडेच राहावे लागणार का? या चिंतेने त्यांना ग्रासले. काही वेळानंतर नदीपात्रात काही नावाडी मासेमारी करीत असल्याचे पाहून शेळक्यांना दिलासा मिळाला. त्यांनी आपली परिस्थिती सांगून नावेतून शेळ्यांना पैलतीरावर नेऊन सोडण्याची विनंती त्यांना केली. नावाड्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता संपूर्ण शेळ्यांना नावेद्वारे सुखरूप काठावर आणल्याचे गणपूरचे सरपंच संतोष गद्दे, तलाठी संदेश झुलकंटीवार यांनी दिली सांगितले. शेळ्यांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या त्या नावाड्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.