त्रिपुरारी बंजारे (३५), रा. करमतरा, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगढ) असे आराेपीचे नाव आहे. तर मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (३३) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्रिपुरारी हा मानसिक रुग्ण असल्याने देऊळभट्टी येथील त्याच्या सासऱ्याने दाेघांना राहण्यासाठी आपल्या गावी देऊळभट्टी येथे आणले हाेते. रविवारी सकाळी ८.३० वाजता मंगेश्वरी ही जेवण करीत असताना अचानक त्रिपुरारी याने तिच्या डाेक्यावर लाेखंडी सळाखीने जाेरदार वार केला. यात ती जमिनीवर काेसळली. तिला प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल येथे दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले. डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगेश्वरीला पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी आहे.
घटनेनंतर आराेपीने युरिया खत खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला गडचिराेली येथे भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या विराेधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरची पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र कोटगूल येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाल करीत आहेत.